छत्रपती संभाजीनगर : बाजारात टोमॅटोला सोन्याचा भाव आल्याने शेतातील कच्चे टोमॅटोही चोरीला जाऊ लागले आहेत, ही बाब लक्षात येताच, रात्रंदिवस टोमॅटो राखण्यासाठी गंगापूर तालुक्यातील एका शेतकऱ्याने चक्क २२ हजार रुपये खर्चून शेतात सीसीटीव्ही बसविले. यामुळे हा शेतकरी सध्या राज्यात चर्चेत आला आहे.
काही महिन्यांपासून टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत. कुठे पतीने टोमॅटो खाल्ले म्हणून पती-पत्नीचे भांडण पोलिस ठाण्यापर्यंत गेले. तर कुठे टोमॅटो चोरीच्या घटना घडल्या. गंगापूर तालुक्यातील शहापूर बंजरचे सरपंच तथा शेतकरी शरद रावते हे वडिलोपार्जित शेतीमध्ये बाराही महिने टोमॅटोचे उत्पादन घेतात. आता त्यांच्या दीड एकर शेतीत चांगले टोमॅटो लागले आहेत. काही दिवसांपूर्वी शेतातील दहा ते बारा क्रेट टोमॅटो चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. सुरक्षारक्षक ठेवणे परवडणारे नसल्याने त्यांनी शक्कल लढवली आणि शेतात चक्क २२ हजार रुपये खर्च करून सीसीटीव्ही कॅमेरे बसविले. दिवसरात्र नजर ठेवणाऱ्या या कॅमेऱ्याचे छायाचित्रण ते त्यांच्या मोबाइलवर कधीही पाहू शकतात. एवढेच नव्हे तर शेतात चोर शिरल्याचे निदर्शनास येताच ते मोबाइलवर बटण दाबून सायरन वाजवू शकतात.
दहा क्रेट टोमॅटो चोरीससात-ते आठ दिवसांत टोमॅटो तोडणीला येणार आहेत. चोरट्यांनी आतापर्यंत आठ ते दहा क्रेट टोमॅटो लंपास केले होते. हे रोखण्यासाठी दिवसरात्र नजर ठेवता येईल असा एकमेव उपाय म्हणजे सीसीटीव्ही असल्याचे लक्षात आले. यामुळे सुमारे २२ हजार रुपये खर्च करून उच्चप्रतीचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत.- शरद रावते, शेतकरी, रा. शहापूर बंजर, ता. गंगापूर