औरंगाबाद: राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर बेताल वक्तव्य केल्याने कृषिमंत्री अब्दुल सत्तार टीकेचे धनी झाले होते. यापासून धडा घेत मंत्री सत्तार आता प्रतिक्रिया देणे टाळत आहेत. खा. संजय राऊत यांना जामीन मिळाली यावर त्यांनी बोलणे टाळले. तसेच आता काही बोलणार नाही, अन्यथा पुन्हा एखादे भूत मागे लागेल असे म्हणत कानावर हात ठेवले. याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून नेहमी कडक शब्दात प्रतिक्रिया देणाऱ्या मंत्री सत्तार यांच्या अचानकपणे बदलेल्या भूमिकेची चर्चा सुरु झाली आहे.
कृषिमंत्री अब्दुल सत्तार कायमच आपल्या वक्तव्यांनी चर्चेत राहत आले आहेत. कधी जिल्हाधिकाऱ्यांना दारू पिता का ? असे विचारणे तर कधी शेतकऱ्यांना अपशब्द वापरल्याने यापूर्वी मंत्री सत्तार चर्चेत आले होते. मात्र, दोन दिवसांपूर्वी सिल्लोड येथे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल त्यांनी खालच्या स्तरावर टीका केली. यामुळे त्यांच्याविरोधात टीकेची झोड उठली. राष्ट्रवादीने तीव्र आंदोलन करत सपशेल माफीची मागणी केली. सर्पक्षीय राजकीय नेत्यांनी याची दखल घेत सत्तार यांना कडक शब्दात सुनावले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा यावर प्रतिक्रिया दिली. यानंतर मंत्री सत्तार यांच्यात बदल होईल का याची उत्सुकता होती.
दरम्यान, खा. संजय राऊत यांना काल जामीन मिळाली आहे. यानंतर शिवसैनिक वाघ पिंजऱ्यातून बाहेर म्हणत जल्लोष करत आहेत, यावर मंत्री सत्तार यांची प्रतिक्रिया विचारण्यात आली. यावेळी सत्तार यांनी एकदमच सावध भूमिका घेतली. न्यायालयाच्या आदेशाने त्यांना जामीन मिळाली आहे. यावर काही बोलणार नाही, अन्यथा पुन्हा एखादे भूत मागे लागेल असे म्हणत त्यांनी अधिक बोलणे टाळले. मी जे बोलतो ते स्पष्ट बोलतो. कोर्टाच्या निर्णयाचा सन्मान केला पाहिजे, असे बोलत सत्तार यांनी कानावर हात ठेवले. मात्र, त्यांच्या या बदलेल्या भूमिकेने सारेच आवक झाले. सर्वस्तरातील टीका की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या तंबीने मंत्री सत्तार मवाळ झाले याबद्दल आता चर्चा रंगली आहे.