औरंगाबाद : जगप्रसिध्द वेरुळ लेणी येथे पर्यटक आणि लेणी सुरक्षेसाठी बंदोबस्तावर असलेले पोलिसच पर्यटकांची लुट करत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. पोलिसांकडून परराज्यातून आलेल्या पर्यटकांकडे 'गाडी सोडायची असेल तर चारशे रुपये दे आणि दोनशेची पावती घे', अशी बिनधास्त मागणी करणारी घटना उघडकीस आली आहे. याबाबतचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने पर्यटकांच्या होणाऱ्या लुटीबद्दल संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
खुलताबाद पोलीस ठाण्याच्या अंतर्गत वेरुळ लेणी येथे एक पोलीस चौकी उभारण्यात आली आहे. या लेणीच्या रक्षणासाठी व देश -विदेशातील पर्यटकांच्या समस्या सोडविण्यासाठी येथे कायम पोलीस कर्मचारी तैनात असतात. मात्र लेणी आणि पर्यटकांची सुरक्षा सोडून हे पोलीस पर्यटकांची नियमांच्या नावाखाली प्रचंड लुट करत आहेत. असाच एक प्रकार बुधवारी गुलबर्गा येथून आलेल्या पर्यटकांसोबत घडला. येथील पोलीस कर्मचारी शेख हारुण शेख रशिद याने लेणी पाहण्यासाठी आलेल्या या पर्यटकांची गाडी तपासणीच्या नावाखाली अडवली. पर्यटकाकडून गाडी सोडायची विनंती करताच, गाडी सोडायची असेल चारशे रुपये द्यावे लागतील मात्र पावती दोनशे रुपयाचीच मिळेल अशी बिनधास्त मागणी केली.
यावर दोनशे रुपयांच्या पावतीसाठी चारशे रुपये का घेता? असा सवाल पर्यटकांनी केला, तर पोलिसांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. विशेष म्हणजे पोलीस स्वतः पावतीचे पैसे घेतात आणि वरचे पैसे झिरो पोलीसाकडे देण्यास सांगून पर्यटकांना सर्रास लुटत आहेत. हे सारे चित्रित झालेला एका व्हिडीओच सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल होताच पोलीस प्रशासनाने याची गंभीर दखल घेत या प्रकरणातील पोलिस कर्मचारी शेख हारुण शेख रशिद याला निलंबित केले आहे.
असे असेल तर आम्ही कसे यावे आपल्या अलौकिक रचनेसाठी जगप्रसिद्ध असलेल्या वेरुळच्या लेणीस पाहण्यासाठी फक्त राज्यभरातूनच नाही, तर देश आणि परदेशातून पर्यटक मोठ्याप्रमाणावर येथे येतात. मात्र या पर्यटकांना पोलिस कशी वागणूक देतात, याचेच विदारक चित्र या व्हिडीओच्या माध्यमातून समोर आल आहे. यावेळी पोलिसांच्या वागणुकीमुळे त्रस्त झालेले पर्यटक, 'तुम्ही असे कराल तर आम्ही कसे यावे' अशी आर्जव करतानाही दिसत आहे.हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने पर्यटकांच्या होणाऱ्या लुटीबद्दल संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.