छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ठिकठिकाणी भितींवर 'एबीव्हीपी' ही इंग्रजी अक्षरे रातोरात रंगविण्यात आली.एवढेच नाही तर महात्मा फुले-डॉ.आंबेडकर विचारधारा व संशोधन केंद्र या नावाच्या पाटीवर फुले-आंबेडकर नावावर 'एबीव्हीपी' असे लिहिण्यात आले. त्यामुळे संतापलेल्या आंबेडकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) पदाधिकाऱ्यांना उपहारग्रहात बेदम चोप दिला. हा प्रकार मंगळवारी ( दि.१७) दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडला. या प्रकरणी दोन्ही गट परस्पर विरोधी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया बेगमपुरा पोलिस ठाण्यात सुरू होती.
विद्यापीठातील विविध विभागांच्या भिंतीवर 'एबीव्हीपी','जॉईन एबीव्हीपी'अशा पद्धतीने दोन दिवसांपूर्वी रात्री लिहिण्यात आले होते. त्यावर आंबेडकरी संघटना, एसएफआयसह इतर संघटनांनी आक्षेप नोंदविण्यात आला.विद्यापीठ परिसराचे विद्रुपीकरण केल्यामुळे संबंधितांवर कारवाईची मागणीही करण्यात आली. ही अक्षरे १३ ऑक्टोबरच्या रात्री लिहिण्यात आली होती. त्यानंतर सलग दोन दिवस सुट्या असल्यामुळे त्याकडे कोणाचेही लक्ष गेले नाही. १६ ऑक्टोबर रोजी एसएफआयसह इतर विद्यार्थी संघटनांनी कुलगुरूंना निवेदन देत विद्यापीठाचे विद्रुपकरण करणाऱ्या अभाविपच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली होती. विद्यापीठ प्रशासनाने वाद वाढण्याची चिन्हे पाहून स्वतःहून जेवढ्या ठिकाणी 'एबीव्हीपी' अशी अक्षरे लिहिण्यात आली होती ती सर्व पांढरा रंग लावून पुसून टाकली.
दरम्यान, 'महात्मा फुले-डॉ.आंबेडकर विचारधारा व संशोधन केंद्रा'च्या नावावर 'एबीव्हीपी'असे लिहिल्यामुळे आंबेडकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये तिव्र संताप होता. त्यामुळे १० ते १५ कार्यकर्त्यांनी मंगळवारी दुपारी मुख्य प्रशासकीय इमारतीसमोरील उपहारग्रहात चहा पित बसलेल्या अभाविपच्या पदाधिकाऱ्यांना जाब विचारला. त्यात झालेल्या बाचाबाचीत अभाविपच्या पदाधिकाऱ्यांना बेदम चोप देण्यात आला. तेव्हा अभाविपच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्य इमारतीमध्ये धाव घेतली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. दरम्यान, एबीव्हीपीवर कारवाईची मागणी करत उद्या विद्यापीठात शैक्षणिक बंदचे आवाहन रिपब्लिकन विद्यार्थी सेना, पँथर्स रिपब्लिकन विद्यार्थी आघाडी, रिपब्लिकन बहुजन सेना, सम्यक विद्यार्थी आंदोलन यांच्यातर्फे करण्यात आले आहे.