औरंगाबाद: फटाक्यांच्या आतिषबाजी शिवाय दिवाळीचा आनंद नाही. पण काळजी घेतली नाही तर याच फटक्यामुळे मोठी दुर्घटना घडू शकते. असे असतानाही तरुणांच्या दोन गटांनी एकमेकांवर पेटते फटाके फेकल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार परिसरातील खामगाव येथील असल्याची माहिती आहे.
दोन वर्षानंतर यंदा निर्बंधमुक्त दिवाळी साजरी होत आहे. नागरिकांनी मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करत असल्याचे सर्वत्र दिसत आहे. याच दरम्यान काही टवाळखोर 'फटाकेबाजी' करत एकमेकांना इजा करण्याचा प्रयत्न करत असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार परिसरातील खामगांव येथील हा व्हिडीओ आहे. दिवाळी साजरी करतांना काही तरुणांनी चक्क एकमेकांच्या अंगावर पेटते फटाके फेकण्याचा स्टंट केल्याचे समोर आले आहे.
या परिसरातील तरुणांचे तीन वेगवेगळे गट आमने-सामने आले, त्यानंतर अचानक त्यांच्यात वाद उफाळून आला. ऐवढ्यात हे तरुण फटाके पेटवून एकमेकांच्या अंगावर फेकत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. याबाबत माहिती मिळताच पोलिसांना घटनास्थळी धाव घेतली. मात्र पोलिसांची गाडी येताच तरुणांनी तेथून पळ काढला. दरम्यान, औरंगाबादमधील मुकुंदवाडी परिसरात फटाके पेटविण्यावरून एका तरुणास १० जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. यातील ८ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.