औरंगाबाद : राज्य सरकारने महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या भरतीवर बंदी घातली आहे. ही बंदी उठविण्याच्या मागणीसाठी शेकडो बेरोजगार युवकांनी एकत्र येत विद्यापीठात आज दुपारी आक्रोश मोर्चा काढला. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधातील घोषणाबाजीने परिसर दणाणला. येत्या १४ मे पर्यंत सरकारने नोकरभरतीवरील बंदी न उठविल्यास मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू करण्यात येईल. तरीही सरकार दाद देत नसेल तर शेजारील अरबी समुद्रात बेरोजगार जलसमाधी घेतील असा निर्धार यावेळी आंदोलकांनी केला.
राज्य सरकारने मागील वर्षीपासून महाविद्यालयातील प्राध्यापक भरतीवर बंदी घातली आहे. तासिका तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांच्या वेतनामध्ये वाढ करण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. यासह इतर मागण्यांवरही राज्य सरकार कोणताच निर्णय घेत नाही. यामुळे राज्यभरात पी.एचडी., सेट-नेटधारक बेरोजगारांनी ठिकठिकाणी मोर्चे काढून आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातही प्रवेशद्वार ते प्रशासकीय इमारत या दरम्यान निषेध मोर्चा काढला होता. या मोर्चामध्ये शेकडो बेरोजगारांनी पांढरी टोपी, निषेधाचा फलक, काळा झेंडा हाती घेऊन सहभाग नोंदवला. प्रवेशद्वारावरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाला सुरुवात झाली. यावेळी ‘नोकरभरती सुरू झालीच पाहिजे...झालीच पाहिजे’, ‘फडणवीस सरकार तुम होश मे आओ..होश मे आओ’, ‘होश मे आके काम करो, होश मे आके काम करो’, ‘मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, अर्थमंत्री मुर्दाबाद..मुर्दाबाद’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. मोर्चा प्रशासकीय इमारतीसमोर आल्यानंतर शिष्टमंडळाने प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य किशोर शितोळे यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.
या मोर्चात संयोजक डॉ. संदीप पाथ्रीकर, श्रीराम फरताडे, डॉ. संतोष जाधव, प्रविणकुमार डोळे, नारायणराव आबुज, बालाजी मुळीक, विठ्ठल चोपडे, कविश्वर नलावडे,डॉ. गणेश राठोड, धम्मज्योत गायकवाड, डॉ. ललित गोल्डे, गोविंद खडप, कपिल धोंगडे, लोकेश कांबळे, सत्यजित म्हस्के, प्राजक्ता शेटे, रूपाली सुरासे, सोनाली इंगळे, मनिषा सुरासे, रूपाली मोरे, कांचन शेंडे, डॉ. कुणाल खरात, अॅड. सुनिल राठोड, डॉ. गोवर्धन भुतेकर, दीपक बहिर, यशोदिप पाटील, प्रदीप शहाणे, रवि कदम यांच्यासह शेकडो बेरोजगार सहभागी झाले होते.
कॅम्पसमधील एकाच प्राध्यापकाची उपस्थिती बेरोजगार युवकांनी नोकरभरतीसाठी काढलेल्या मोर्चात विद्यापीठाच्या कॅम्पसमधील डॉ. राम चव्हाण हे एकमेव प्राध्यापक सहभागी झाले होते. मोर्चा काढणारे विद्यार्थी हे आपलेच विद्यार्थी आहेत. त्यांना नोकरी मिळाली पाहिजे, हीच इच्छा आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना नैतिक पाठिंबा देण्यासाठी मोर्चात सहभाग नोंदविल्याचे डॉ. चव्हाण यांनी सांगितले.
...तर अरबी समुद्रात जलसमाधी घेणारआतापर्यंत मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, अर्थमंत्री, विरोधी पक्षनेते, सचिव, उच्चशिक्षण संचालक अशा विविध उच्चपदस्थाना नोकरभरतीवरील बंदी उठविण्यासाठी निवेदने दिली आहेत. मात्र कोणीही त्याची साधी दखल घेतली नाही. यामुळे येत्या १४ मे पर्यंत नोकरभरतीवरील बंदी न उठविल्यास मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू करण्यात येईल. तरीही सरकार दाद देत नसेल तर शेजारील अरबी समुद्रात बेरोजगार जलसमाधी घेतील, अशी माहिती डॉ. संदीप पाथ्रीकर, श्रीराम फरताडे यांनी यावेळी बोलताना दिली.