औरंगाबाद - राजीव गांधींच्या काळात शरद पवारांनी जेव्हा काँग्रेस सोडली तेव्हा सांगितलं होतं की एकवेळ मी भस्म लावेन पण पुन्हा काँग्रेसमध्ये जाणार नाही, मग भस्म जपून ठेवा निवडणुकीनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला भस्म घेऊन हिमालयात जायचे आहे. शरद पवारांना थोडं डांबर आणून देतो पण त्या डांबरालाही लाज वाटेल, कारण डांबरापेक्षा शरद पवारांचे मन काळं आहे अशी जहरी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केली आहे.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, जयंत पाटील बोलतात शिवसेनेने भाजपला मिठी का मारली. मग काय तुम्हाला मिठी मारायची होती. शरद पवारांनी काँग्रेसची युती तोडली तेव्हा म्हणाले की मी यापुढे काँग्रेसमध्ये जाणार नाही एक वेळेस तोंडाला काळ लावीन पण पुन्हा काँग्रेस नाही. शरद पवार तुम्हाला थोडा डांबर लावू का ? असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.
मराठवाड्यात पंतप्रधान आले होते. युती ही महाराष्ट्रासाठी केली. मराठवाड्यासाठी केली. मतदान झाल्यानंतर जी वचने दिलेली आहेत ती सर्व कामे झाली पाहिजेत. मुला-मुलींच्या लग्नाच्या चिंतेमुळे दारिद्र्यामुळे शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. गरीब शेतकऱ्यांना यांच्या मुला मुलींसाठी सामूहिक विवाह सोहळ्याचे शिवसेनेकडून आयोजन करण्यात आले. शेतकऱ्यांना पाण्याचा प्रश्न आहे. तुमच्या हक्काचा पाणी दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. शेतकऱ्यांच्या पाठिशी शिवसेना ठामपणे उभी आहे असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला.
नावापुढे राष्ट्रवादी लावून कोणी राष्ट्रवादी होत नाही. युती ही माझ्या महाराष्ट्रासाठी आणि मराठवाड्यासाठी केली. केंद्रात, राज्यात आपले सरकार येणारच, मतदानानंतर ताबडतोबत दुष्काळावर काम करणार आहोत. जात पात धर्म आणि मानत नाही. मी जर खोटं बोललो तर शिवसेनाप्रमुख कधीच माफ करणार नाहीत. आम्ही हिंदुत्वासाठी काम करतो. एमआयएम, राष्ट्रवादी, काँग्रेस हे कशासाठी काम करतात माहीत नाही. मत मागणारे कोणाचे वारसदार आहेत हे जनतेने पाहावं असं उद्धव यांनी सांगितले.
जो शिवसेनेशी गद्दारी करेल त्याचा शिवसेनेशी काहीही नात राहणार नाही. माझा युतीचा निर्णय तुम्हाला पटलेला आहे की नाही. असा सवाल उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना केला. तसेच 56 पक्ष युतीला गाडण्यासाठी एकत्र आले आहेत. छप्पन्न पिढ्या जरी वरून खाली उतरला तरी आम्हाला गाडू शकणार नाहीत असा घणाघात उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर केला.