छत्रपती संभाजीनगर : रोजाबाग मनपा शाळेत इयत्ता पहिल्या वर्गातील चिमुकली उम्मेखैर मुजम्मिल तय्यब ही सोमवारी शाळा सुटल्यावर परत वर्गात डबा आणायला गेली होती. त्याचदरम्यान वॉचमनने वर्गखोली बंद केल्याचे मंगळवारी चौकशीत उघड झाले. महापालिकेच्या उपायुक्त नंदा गायकवाड, शिक्षणाधिकारी भारत तीनगोटे यांच्या पथकाने शाळेत पालक आणि नागरिकांशी संवाद साधला. या प्रकरणात लवकरच कारवाई प्रस्तावित केली जाणार असल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले.
सोमवारी दुपारी २ वाजता शाळा सुटली. उम्मेखैर ही चिमुकली वर्गात असतानाच वॉचमन विठ्ठल बमणे याने कुलूप लावले. थोड्या वेळानंतर चिमुकली रडू लागली. आसपासच्या नागरिकांनी कुलूप तोडून तिला बाहेर काढले. या घटनेमुळे पुन्हा एकदा मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. घटनेचे गांभीर्य ओळखत मनपा अधिकाऱ्यांचे पथक मंगळवारी सकाळीच शाळेत दाखल झाले. अगोदर शिक्षिका नर्गिस फातेमा यांच्यासोबत चर्चा केली. उम्मेखैर या चिमुकलीच्या पालकांना बोलावण्यात आले. तिच्या आईने यासंदर्भात कोणतीही तक्रार नसल्याचे सांगितले. चिमुकली सर्वांसोबत वर्गाबाहेर पडली. थोड्या वेळानंतर जेवणाचा डबा वर्गात राहिल्याचे लक्षात आल्यावर ती एकटीच आत गेली. तेवढ्या वेळात वर्गाला कुलूप लावण्यात आले. ज्या नागरिकांनी चिमुकलीला बाहेर काढले, त्यांनी दोषींवर कारवाईची मागणी पथकासमोर केली.
कारवाई प्रस्तावित होईलवरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार मंगळवारी चौकशी करण्यात आली. लवकरच कारवाई प्रस्तावित केली जाईल. शहरातील सर्व मनपा शाळांमध्ये यापुढे खबरदारी घ्यावी, अशी सूचना सर्व शिक्षक, शिपाई आणि वाॅचमनला देण्यात आल्याचे प्रभारी शिक्षणाधिकारी भारत तीनगोटे यांनी सांगितले.