औरंगाबाद : व्हिडिओकॉन या बड्या कंपनीशी संबंधित ठिकाणांवर अंमलबजावणी संचालनालयाकडून ( ईडी) शुक्रवारी धाडी टाकण्यात आल्या. ईडीने व्हिडिओकॉनच्या मुंबई, औरंगाबादसह विविध ठिकाणांवर धडी टाकत झाडाझडती सुरु केली आहे. व्हिडिओकॉनचे अध्यक्ष वेणुगोपाल धूत आणि समूहाशी संबंधित ठिकाणांवर मनी लाँड्रिंग प्रकरणी ही कारवाई करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. ( Videocon's places raided by ED in Mumbai, Aurangabad)
मोझाम्बिक आफ्रिकेच्या एका तेल क्षेत्राच्या विक्रीत समूहाकडून कथित कर्ज फसव्नुकीशी याचा संबंध आहे. सध्या या प्रकरणात मुंबईत अनेक ठिकाणांवर धाडी टाकण्यात येत आहेत. ईडीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, कंपनीने कर्जाची रक्कम वळविल्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. ईडीकडून सुरु असलेल्या तपासाचे हे प्रकरण सीबीआयने दाखल केलेल्या एका गुन्ह्याशी संबंधित आहे. व्हिडिओकॉन इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष वेणुगोपाल धूत यांच्याविरुद्ध कथितरीत्या बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखाली बँकांच्या समूहाची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याचा ठपका आहे. धूत यांच्यासह बँकांच्या समूहाचे अज्ञात अधिकारी यांच्याविरुद्ध सीबीआयने भ्रष्टाचार, फसवणूक आणि गुन्हेगारी कट प्रकरणात गुन्हा दाखल केलेला आहे.
आयसीआयसीआय बँकेने व्हिडिओकॉन समूहाला दिलेल्या कोट्यवधी रुपयांच्या कर्ज प्रकरणात गैरव्यवहार झाल्याने या प्रकरणाचा तपास अंमलबजावणी संचालनालय आणि केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) या दोन केंद्रीय संस्था करीत आहेत. या प्रकरणात बँकेच्या माजी कार्यकारी संचालक तथा सीईओ चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर आणि उद्योगपती वेणुगोपाल धूत यांच्यावर यापूर्वीच गुन्हे दाखल आहेत.
अशी झाली कारवाई गुरुवारी मध्यरात्री ईडीचे पथक शहरात दाखल झाले होते. शुक्रवारी सकाळी ८ वाजेपासून त्यांनी सर्व मालमत्तांबाबत माहिती संकलनाची कार्यवाही सुरू केली. या कारवाईबाबत कमालीची गुप्तता बाळगण्यात आली होती. शहरातील होम अप्लायसेन्सच्या शोरूम्समधील व्यवहारांची पथकाने चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे. रेल्वे स्टेशन रोडवरील धूत यांचा बंगला दुपारी २ वाजेनंतर ईडीच्या पथकाने ताब्यात घेतला. या पथकामध्ये चार अधिकाऱ्यांसह केंद्रीय पोलीस दलांचे कर्मचारी होते. बंगल्यातील पहिल्या शिफ्टमधील कर्मचारी निघून गेल्यानंतर दुसऱ्या शिफ्टमधील कर्मचाऱ्यांना सुरक्षा कॅबिनजवळच थांबविण्यात आले होते. ईडीच्या अधिकाऱ्यांनी बंगल्याच्या आत गेल्यानंतर ते सायंकाळी उशिरापर्यंत झडती घेत होते. ७ वाजेच्या सुमारास दोन अधिकारी कारमधून रेल्वे स्टेशनच्या दिशेने गेले. इतर दोन अधिकारी बंगल्यात होते. दरम्यान, वेदांतनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी बंगल्यासमोर येऊन पाहणी करून निघून गेले.
बंगल्यावर काही अधिकारी आले होतेईडीच्या छाप्याप्रकरणी उद्योगपती प्रदीप धूत यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, मी सध्या तीर्थयात्रेनिमित्त हृषीकेश येथे आहे. आमच्या घरावर कुठलाही छापा पडलेला नाही. काही अधिकारी सकाळी ९ वा. बंगल्यावर आले होते. कर्मचाऱ्यांना भेटून गेले. एवढीच माहिती माझ्याकडे आहे.
आयसीआयसीआय बँकेचे नेमके प्रकरण कायआयसीआयसीआय बँकेने व्हिडिओकॉनसंबंधी दिलेल्या कर्ज घोटाळ्यात ईडीने यापूर्वीच आरोपपत्र दाखल केलेले आहे. बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर, कंपनीचे वेणुगोपाल धूत यांचे आरोपपत्रात नाव आहे. दीपक कोचर हे व्हिडिओकॉनची उपकंपनी असलेल्या न्यू पॉवर या कंपनीचे संचालक होते. ही कंपनी केवळ कागदोपत्री होती. चंदा कोचर यांनी या कंपनीला १८७५ कोटी रुपयांचे कर्ज दिले, पुढे ते कर्ज बुडीत खात्यात गेले. या प्रकरणी ईडीने २०१८ पर्यंत चौकशी केली होती. यानंतर ईडीने धूत व कोचर दाम्पत्याविरोधात पीएमएलए (मनी लाँड्रिंग) न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. या कारवाईनंतर व्हिडिओकॉनच्या मालमत्तांवर सीबीआयनेदेखील छापे मारले होते. दरम्यान, ४६ हजार कोटींच्या कर्जाच्या बोझाखाली दबलेल्या व्हिडिओकॉन उद्योगाची मागील काही महिन्यांत २९०० कोटी रुपयांत सेटलमेंट होऊन कंपनीचे दुसऱ्या ग्रुपकडे हस्तांतरण करण्यात आले आहे. ९४ टक्क्यांच्या आसपास बँकांचे नुकसान या व्यवहारात झाले आहे.