औरंगाबाद/ नाशिक : औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी शिवसेनेने महायुतीच्या मतदारांना इगतपुरी येथील दोन पंचतारांकित हॉटेलमध्ये नजरकैदेत ठेवले आहे. तळेगाव भागातील विवांत आणि बलायदुरी येथील बोध व्हॅली (पूर्वीचे रेन फॉरेस्ट) या दोन ठिकाणी त्यांना शाही वागणूक दिली जात आहे. अंतर्गत धुसफूस होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून ‘मातोश्री’च्या आदेशानुसार ठाणे आणि मुंबई येथील शिवसैनिक त्यांच्यावर पाळत ठेवून आहेत. तसेच गोपनीय माहिती मिळविण्यासाठी पोलिसांचे पथकही त्या भागात तैनात आहे.
महायुतीच्या मतदानासाठी इगतपुरी येथे मतदार आणण्याचे निश्चित झाल्यावर लोकमतचे प्रतिनिधी भास्कर सोनवणे यांनी हॉटेल्सचा शोध घेतला. विवांत आणि बलायदुरी येथील बोध व्हॅलीत मतदार असल्याचे त्यांना आढळून आले. शनिवारी संध्याकाळी शिवसेनेचे मुंंबईतील पदाधिकारी इगतपुरी येथे आढावा घेणार असून, मते पक्की करण्यासाठी अर्थकारणातून मार्ग काढणार आहेत. औषधांचा बहाणा कोणीही करू नये, यासाठी खासगी आरोग्य पथक कार्यान्वित करण्यात आले आहे.
या निवडणुकीसाठी १९ आॅगस्ट रोजी मतदान होणार आहे. महायुतीकडे ३३०, महाआघाडीकडे २५० तर एमआयएम-अपक्ष मिळून ७७, असे ६५७ मतदारांचा आकडा निवडणुकीसाठी आहे. १५ आॅगस्ट रोजी दुपारी २ वा. जालना रोडवरील एका ठिकाणावरून शहरातील महायुतीच्या मतदारांना इगतपुरीकडे पाठविण्यात आले. फोडाफ ोडीचे राजकारण आणि मतदार विरोधकांच्या प्रलोभनाला बळी पडू नयेत यासाठी महायुतीचे उमेदवार अंबादास दानवे यांच्यासाठी पूर्ण दक्षता घेतली आहे. तसेच महाआघाडीनेदेखील उमेदवार भवानीदास ऊर्फ बाबूराव कुलकर्णी यांच्यासाठी मतदारांना अज्ञातस्थळी रवाना केले आहे. १८ आॅगस्ट रोजी सकाळी महायुतीचे मतदार शहरात दाखल होतील. तेथून १७ मतदान केंद्रांवर गटनिहाय त्यांना पाठविण्यात येणार आहे. महाआघाडीनेदेखील मतदारांची पूर्ण दक्षता घेतली असून, पसंतीक्रमाचे गणित जुळविल्याचा दावा आघाडीकडून केला जात आहे. तर महायुतीने पहिल्याच पसंतीसाठी पूर्ण तयारी केली आहे. महायुतीचे दुसऱ्या पसंतीचे मतदान कुणालाही जाणार नाही, असा दावा करण्यात येत आहे. दरम्यान शनिवारी माजी खा.चंद्रकांत खैरे हे इगतपुरीला महायुतीच्या मतदारांच्या भेटीसाठी जाणार आहेत.
मागील अनुभवामुळे पारदर्शकता२०१३ साली झालेल्या निवडणुकीत की- चेन कॅमेऱ्याचा वापर करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडे आहे. त्यामुळे यावेळी पारदर्शकतेसाठी काही कडक नियम अंमलात आणले जाणार असल्याचे उपजिल्हाधिकारी नीलेश श्रींगी यांनी सांगितले. मतदान करण्यासाठी निवडणूक आयोगाने दिलेला विशेष पेन मतदारांना देण्यात येईल. तसेच विशेष डिटेक्टरच्या साह्याने मतदारांची तपासणी करून त्यांना मतदान केंद्रात प्रवेश दिला जाईल. गुप्त कॅमेरा, वाहनांच्या चाव्या, बटनमधील गुप्त कॅमेरा त्यांच्याकडे असल्यास तो जप्त करण्यात येईल. आजवरच्या निवडणुकीतील अनुभवामुळे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
चार वातानुकूलित बसेस, शाही पाहुणचारएमएच १६ पासिंग असणाऱ्या आनंद ट्रॅव्हल्स कंपनीच्या ४ बस हॉटेलच्या बाहेर सज्ज असून, हॉटेल परिसरात इतर चारचाकींसह शिवसेनेचे पक्षचिन्ह अंकित बरीच वाहनेही उभी आहेत. प्रत्येक बसमधील वाहकालाही बसमध्ये सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. हे सगळे नियंत्रित करण्यासाठी विश्वासू व्यक्ती भरपावसात लक्ष ठेवून आहेत. अनेक मतदार परिवारासह या सहलीला आले आहेत. हवा तसा पाहुणचार असूनही घरच्यांमुळे तळीराम मतदारांची अडचण झाली आहे. इगतपुरी भागातील धरणे, धबधबे वगैरे पाहावे म्हणून काही मतदारांचा आग्रह आहे. मात्र नियोजनानुसार हट्ट पूर्ण करता येत नसल्यामुळे अंतर्गत धुसफूस सुरू आहे. निकालानंतर पुन्हा पर्यटनाला येऊ, असे आश्वासन पाहुण्या मतदारांना दिली जात आहे.कोणालाही बाहेर जाऊ न देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मतदारांनी त्यांना दिलेल्या रूममधून बाहेर पडू नये म्हणून विशेष काळजी घेतली जात आहे.