विधानसभा अध्यक्षांनी फुलंब्रीतूनच केले ३ आमदारांचे राजीनामे मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 05:26 PM2019-09-14T17:26:00+5:302019-09-14T17:50:31+5:30

अध्यक्षही निवडणुकीच्या प्रचाराला लागल्यामुळे ते सध्या मुंबईऐवजी फुलंब्री मतदारसंघात जनसंपर्कात अडकलेले आहेत.

Vidhan Sabha chairman sanctions three MLA resigns from Fulambri | विधानसभा अध्यक्षांनी फुलंब्रीतूनच केले ३ आमदारांचे राजीनामे मंजूर

विधानसभा अध्यक्षांनी फुलंब्रीतूनच केले ३ आमदारांचे राजीनामे मंजूर

googlenewsNext
ठळक मुद्देधावपळीत जाधवांचा राजीनामा पक्षप्रवेश सोहळ्याची लगीनघाई

औरंगाबाद : शिवसेना आणि भाजपामध्ये सध्या पक्षांतर करून येणाऱ्यांची भरती जोरदार सुरू आहे. पक्षांतर करून युतीमध्ये प्रवेश घेणाऱ्यांना विद्यमान आमदारकीचा राजीनामा द्यावा लागणार असल्यामुळे त्यांना मुंबईऐवजी औरंगाबादेतील फुलंब्री तालुक्यात यावे लागले आहे. आणखी किती जणांचे राजीनामे धावपळीत मंजूर होतील, हे पक्षांतर करणारे जेव्हा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या द्वारी येतील, तेव्हाच स्पष्ट होईल. शुक्रवारी राष्ट्रवादीचे भास्कर जाधव यांनी आमदारकीचा राजीनामा फुलंब्री मतदारसंघातील कुंभेफळ या गावी येऊन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना सोपविला. त्यांनी तो तातडीने मंजूर केला. राजीनाम्यानंतर जाधव यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. 

बार्शीचे दिलीप सोपल, सिल्लोडचे अब्दुल सत्तार आणि शुक्रवारी रत्नागिरीतील जाधव या तिन्ही लोकप्रतिनिधींना औरंगाबादेत येऊन राजीनामा द्यावा लागला. लोकप्रतिनिधींना पक्षांतर करण्यापूर्वी विधानसभा अध्यक्षांकडे पदाचा राजीनामा द्यावा लागतो. अध्यक्षही निवडणुकीच्या प्रचाराला लागल्यामुळे ते सध्या मुंबईऐवजी फुलंब्री मतदारसंघात जनसंपर्कात अडकलेले आहेत. त्यामुळे विशेष विमानाने, कारने पक्षप्रमुखांनी नेमलेल्या जबाबदार नेत्यांसह पक्षांतर करणारे लोकप्रतिनिधी मुंबईतून थेट फुलंब्रीत येत आहेत. काँगे्रस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत दाखल झालेल्या लोकप्रतिनिधींना अशी धावपळ व आटापिटा करावा लागला आहे. विशेष म्हणजे हे सगळे होत असताना विधानसभा अध्यक्षही जमेल त्या पद्धतीने प्रोटोकॉल मोडून धावपळ करीत संबंधित आमदारांचा राजीनामा मंजूर करीत आहेत. दिलीप सोपल यांचा राजीनामा धावपळीत मंजूर करण्यात आला, तसेच अब्दुल सत्तार यांचा राजीनामा मुलाच्या हस्ते अध्यक्षांकडे पाठविण्यात आला, तोदेखील तातडीने मंजूर करण्यात आला.

विधानसभा अध्यक्षांची धावपळ 
शुक्रवारी भास्कर जाधव हे विशेष विमानाने औरंगाबादेत आले. त्यांच्यासोबत शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर, अनिल परब, आ. अंबादास दानवे, माजी खा. चंद्रकांत खैरे होते. विधानसभा अध्यक्षांना गाठण्यासाठी त्यांनी फुलंब्री मतदारसंघ गाठला. बागडे हे कुंभेफळ परिसरात होते. त्यांचा ताफा शिवसेनेच्या शिष्टमंडळाकडे येत असताना कुंभेफळचे रेल्वेफाटक बंद झाले. त्यामुळे बागडे यांनी दुचाकीवरून शेंद्रा परिसरातील एक कार्यालय गाठले. तेथे जाधव यांचा राजीनामा मंजूर करून त्यांना रवाना केले. राजीनामा मंजुरीसाठी हा आटापिटा, धावपळ पहिल्यांदाच बघितल्याची भावना कुंभेफळ परिसरात होती.

Web Title: Vidhan Sabha chairman sanctions three MLA resigns from Fulambri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.