विधानसभा निवडणूक १९६२ : गोविंदभाई व रफिक झकेरिया यांच्यात औरंगाबादेत चुरशीची लढत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2019 01:36 PM2019-10-02T13:36:40+5:302019-10-02T13:38:08+5:30
संयुक्त महाराष्ट्र राज्याची १९६२ मध्ये पहिली निवडणूक
- शांतीलाल गायकवाड
औरंगाबाद : भारत स्वतंत्र झाल्यानंतर मराठवाड्याचा राजकीय प्रवास पहिल्या विधानसभा निवडणुकीत हैदराबाद स्टेट, दुसऱ्या विधानसभा निवडणुकीत द्विभाषिक मुंबई राज्य व तिसऱ्या निवडणुकीत संयुक्त महाराष्ट्र असा झाला. संयुक्त महाराष्ट्राच्या मराठी भाषिक राज्याच्या पहिल्या निवडणुकीत औरंगाबाद जिल्ह्यातील १० पैकी ९ जागा हस्तगत करून राष्ट्रीय काँग्रेसने वरचष्मा राखला. त्यात औरंगाबाद विधानसभा निवडणूक डॉ. रफिक झकेरिया व मराठवाडा मुक्ती लढ्याचे स्वातंत्र्यसेनानी गोविंदभाई श्रॉफ यांच्यामुळे चुरशीची झाली. त्यात डॉ. रफिक झकेरिया विजयी झाले होेते.
मूळचे कोकणातील रहिवासी , उच्च शिक्षित डॉ. झकेरिया रफिक बालूमिया हे पंडित नेहरू यांच्या आग्रहास्तव औरंगाबादेत आले. काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली. त्यांचे प्रतिस्पर्धी गोविंदभाई श्रॉफ हे अपक्ष लढत होते. १९५१ मध्ये झालेली पहिली निवडणूक गोविंदभार्इंनी प्रजावाणीतर्फे याच मतदारसंघातून लढविली होती. तेव्हाही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. डॉ. झकेरिया यांनी १८ हजार ७६७ मते घेत गोविंदभार्इंवर ३ हजार ९५४ मतांनी विजय मिळविला. गोविंदभार्इंना १४ हजार ८१३ मते मिळाली होती. विजयी डॉ. झकेरिया यांना मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी नगरविकास खात्याचे मंत्रीपद दिले. पुढे डॉ. झकेरिया यांनी मागास औरंगाबादचा रचनात्मक विकास घडवून आणला.
सिल्लोडमधून काळे विजयी
स्वातंत्र्य चळवळीतील धुरंधर बाबूराव काळे यांना काँग्रेसने सिल्लोडमधून उमेदवारी दिली होती. काळे यांनी सीपीआयच्या करुणा चंद्रगुप्त यांचा पराभव केला. काळे यांनी २६ हजार १७१ मते घेत तब्बल १६ हजार ९८० मतांनी चंद्रगुप्त यांना मात दिली होती. पुढे काळे जालना जिल्ह्याचे खासदारही झाले.
संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत २६४ आमदार
मुंबईसह तयार झालेल्या संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या निवडणुकीत विधानसभेचे २६४ मतदारसंघ होते. त्यातील २१५ जागा जिंकून यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री झाले. त्रिंबक भराडे विधानसभा अध्यक्ष झाले. पुढे यशवंतरावांना दिल्लीत जावे लागले. त्यांची जागा मारोतराव कन्नमवार यांनी घेतली; परंंतु ३७० दिवसांच्या कारभारानंतर त्यांचे कार्यालयातच अकाली निधन झाले व वसंतराव नाईक मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. त्यांनी महाराष्ट्रात हरितक्रांती व औद्योगिक क्रांतीही घडविली.
जिल्ह्यात दोन महिला उमेदवार, एक पराभूत
या निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेस व भारतीय कम्युनिस्ट पक्षाने प्रत्येकी एका महिलेला उमेदवारी दिली होती. इतर सर्वच पक्षांनी केवळ पुरुषांनाच उमेदवारी दिली. औरंगाबाद जिल्ह्यात एकूण १० मतदारसंघांतून ३२ उमेदवार रिंगणात होते. त्यात सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून सीपीआच्या करुणा चंद्रगुप्त व वैजापूर मतदारसंघातून काँग्रेसच्या गिरजाबाई मच्ंिछद्रनाथ या महिला लढत होत्या. करुणा चंद्रगुप्त यांचा काँग्रेस उमेदवार बाबूराव काळे यांनी पराभव केला, तर गिरजाबाई मच्छिंद्रनाथ यांनी पीएसपीचे उमेदवार किशोर रामेश्वर पवार यांचा पराभव करून विधानसभा गाठली. वैजापूर मतदारसंघाच्या पहिल्या आमदार आशाताई वाघमारे ठरल्या होत्या. दुसऱ्या निवडणुकीत आशातार्इंचा पराभव झाला. वैजापूरकरांनी गिरजाबाई यांच्या रूपाने दुसऱ्यांदा एका महिलेची आमदार म्हणून निवड केली होती.
औरंगाबाद जिल्ह्यातील आमदार
विधानसभा मतदारसंघ विजयी उमेदवार पक्ष मतदान
औरंगाबाद झकेरिया रफिक बालूमिया काँग्रेस १८,७६७
पैठण कल्याणराव पंढरीनाथ काँग्रेस १६,९८०
गंगापूर यमाजीराव म्हातारराव काँग्रेस २०,६००
वैजापूर गिरजाबाई मच्छिंद्रनाथ काँग्रेस २३,८३०
कन्नड काकासाहेब भिकनराव काँग्रेस २१,९२६
सिल्लोड बाबूराव जंगलू काळे काँग्रेस २६,१७१
अंबड नानासाहेब सावळीराम काँग्रेस १०,८३८
जालना दत्तात्रयराव देशपांडे काँग्रेस ११,५२४
बदनापूर(राखीव) धकाळेश्वर मकाजी काँग्रेस १६,३५७
भोकरदन भाऊराव नरसिंगराव पीडल्ब्यूपी ३२,१६१