- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील फूल मार्केटमध्ये आजपासून पाच दिवसांचा आंबा महोत्सवास सुरुवात झाली. नैसर्गिक पद्धतीने पिकविलेला केशरसह कोकणातील हापूस आंब्याची चव यानिमित्ताने औरंगाबादकरांना चाखायला मिळत आहे.विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत महोत्सवचे उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी आंब्याची चव चाखत आंब्यांची खरेदीही केली.
शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत या संकल्पनेतून राज्य कृषी पणन मंडळ व कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्यातर्फे आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आंबा महोत्सवास गेल्या वर्षी ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. गेल्यावर्षी सुमारे १२ टन आंब्याची विक्री अवघ्या तीन दिवसांत झाली होती. ग्राहकांचा प्रतिसाद लक्षात घेत यंदा हा महोत्सव पाच दिवसांचा करण्यात आला आहे. यावेळी बाजार समितीचे सभापती राधाकिशन पठाडे, उपसभापती भागचंद ठोंबरे, सचिव विजय शिरसाठ, कृषि पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक जी. सी. वाघ आदी उपस्थित होते.