औरंगाबाद : प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जगभरात मान्यता आहे. कोलंबिया विद्यापीठाने तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा विद्यापीठात उभारून त्याला ‘सिम्बॉल आॅफ नॉलेज’ असे समर्पक घोषवाक्य लिहिले आहे. या प्रज्ञासूर्याची जयंती भारतभरात तर साजरी होतेच; परंतु जगभरातील विविध देश व युनायटेड नेशनमध्येही त्यांना अभिवादन केले जाते. जगभरातील जयंती कशी साजरी होते हे पाहण्याचे कुतूहल एका तरुणाला झाले व त्यातून वेबसाईट तयार झाली. आता एका क्लिकवर जगभरातील जयंती तुम्हाला पाहता येईल आणि तुमचा उपक्रम जगभरात पोहोचवताही येईल.
ही संकल्पना अंमलात आणणारे सिद्धार्थ मोकळे यांच्याशी संवाद साधला. ते म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती जगभरात साजरी होत होती. परंतु ही जयंती महाराष्ट्र, भारत आणि देशाबाहेर कशी साजरी होते, हे कुतूहल म्हणून मी शोधत होतो. त्यातून जयंतीची स्वतंत्र वेबसाईट तयार करण्याची कल्पना सुचली व त्यातून ‘डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू भीमजयंती डॉट कॉम’ही वेबसाईट तयार करण्यात आली. जगभरात जयंती साजरी कशी होते, हे सर्वांना एकाच ठिकाणी पाहता यावे, हा उद्देश तर ही वेबसाईट सुरू करण्यामागे आहेच. सोबतच जयंतीनिमित्ताने ज्ञान, कल्पना व संकल्पनाचे आदान प्रदान व्हावे, समित्या-समित्यांमध्ये समन्वय साधला जावा हा यामागील उद्देश आहे. जगभरातील उत्तम लेखकांचे लेख, फोटो, व्हिडिओ यानिमित्ताने संकलित झाले. विधायक विचाराचे चांगले नेटवर्किंगही यानिमित्ताने तयार झाले आहे.
मोकळे म्हणाले, देश व जगभरातील विविध माध्यमातून उमटलेले जयंतीचे संकलित चित्र यानिमित्ताने उभे राहिले. या वेबसाईटवर टाकण्यासाठी आम्ही उत्तमोत्तम कल्पना, लेख, फोटो, उपक्रमांचा शोध घेतो. शिवाय ज्यांनी वेगळे प्रयोग करून जयंती साजरी केली त्याचे फोटो, व्हिडिओ आमच्याकडे पाठविले तरी आम्ही ते या बेवसाईटवर अपलोड करतो. यातून जयंती नेमकी कशी साजरी करावी, याच्या संकल्पना अधिक स्पष्ट व्हायला मदत होते.