लोकमत न्यूज नेटवर्कवैजापूर : रोटेगाव रेल्वेस्टेशन परिसरात गुरुवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वनविभागाने त्वरित पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.गुरुवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास रोटेगाव रेल्वेस्थानकासमोरून जाणाऱ्या चांडगाव रस्त्यावर काही शेतकºयांना बिबट्या दिसला. ही माहिती गावात समजताच रोटेगावचे माजी सरपंच धीरज राजपूत यांच्यासह ४० ते ५० ग्रामस्थांनी खात्री करण्यासाठी चांडगाव रस्त्यावर धाव घेतली. यावेळी बिबट्या शेतीच्या कडेला बसलेला दिसला. त्याला पळवून लावण्यासाठी ग्रामस्थांनी फटाके फोडले.दरम्यान, सध्या चांडगाव, रोटेगाव परिसरात भीतीचे वातावरण आहे. तालुक्यात १५ दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला असून, शेतकरी जीव मुठीत घेऊन शेतात काम करीत आहेत. पंधरा दिवसांपूर्वी बिबट्याने शिवराई शिवारात धमाकूळ घालून चार जणांना जखमी केले होते. त्यानंतर वनविभागाने येथे पिंजरा लावला होता. मात्र, पंधरा दिवसांनंतर पुन्हा रोटेगाव परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली आहे. वनविभागाने त्वरित पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी आहे.
रोटेगाव परिसरात बिबट्याचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 12:13 AM