छत्रपती संभाजीनगर : राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी ‘टॉप फाइव्ह’च्या मुलाखती घेतल्यानंतर तब्बल २० दिवसांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी कोल्हापूर विद्यापीठातील भौतिकशास्त्राचे वरिष्ठ प्राध्यापक डॉ. विजय फुलारी यांची मंगळवारी नियुक्ती केली. डॉ. फुलारी हे गुरुवारी पदभार घेण्याची शक्यता विद्यापीठ प्रशासनाने व्यक्त केली.
विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांचा कार्यकाळ दि. ३१ डिसेंबर २०२३ रोजी पूर्ण झाल्यानंतर पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्याकडे पदभार सोपविण्यात आला होता. तत्पूर्वी नवीन कुलगुरू निवडण्याची प्रक्रिया जून २०२३ मध्येच सुरू करण्यात आली होती. राज्यपालांनी एआयसीटीईचे माजी अध्यक्ष अनिल सहस्त्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली शोध समिती स्थापन केली होती. या समितीने २२ जणांच्या मुलाखती घेऊन पाचजणांच्या नावाची शिफारस राज्यपालांकडे केली होती. राज्यपालांनी दि. ४ जानेवारी रोजी टॉप फाइव्हच्या उमेदवाराच्या मुलाखती घेतल्या होत्या. तेव्हापासून विद्यापीठाला नवीन कुलगुरूंची प्रतीक्षा होती. तब्बल २० दिवसांनी कोल्हापूरचे डॉ. विजय फुलारी यांच्या नावाची निवड करण्यात आली. याविषयीचे पत्रही डॉ. फुलारी आणि विद्यापीठ प्रशासनाला आले आहे.
...अन् फुलारींनी मारली बाजीशोध समितीने टॉप फाइव्हमध्ये पुणे येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागाचे डॉ. संजय ढोले आणि गणित विभागाचे डॉ. विलास खरात, कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागाचे डॉ. विजय फुलारी व जैवतंत्रज्ञान विभागातील डॉ. ज्योती जाधव आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे डॉ. राजेंद्र काकडे यांची शिफारस केली होती. त्यात सुरुवातीला डॉ. काकडे यांच्या नावाची चर्चा करण्यात येत होती. मात्र, काही दिवसांनी डॉ. काकडे यांचे नाव मागे पडून डॉ. फुलारी व पुण्यातील डॉ. ढोले यांच्यात स्पर्धा सुरू होती. डॉ. ढोले यांच्या नावाचे पत्र निघाल्याच्या अफवाही पसरल्या होत्या. मात्र, अखेरच्या क्षणी डॉ. फुलारी यांनी बाजी मारली. डॉ. ढोले यांच्यासाठी भाजपासंबंधित विद्यापीठ विकास मंच प्रयत्न करीत होता, तर डॉ. फुलारी यांचे नाव उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लावून धरले. त्यात पवार यांची सरशी झाल्याचेच स्पष्ट झाले आहे.