औरंगाबाद : विदर्भातील वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील आ.समीर कुणावार यांनी महसूल प्रमाणपत्र देण्यासाठी गावपातळीपर्यंत राबविलेल्या ‘समाधान योजने’तून भाजप मराठवाड्यात समाजसेवा करणार आहे. २२ आॅगस्ट रोजी पैठण तालुक्यामध्ये या योजनेतील पहिले शिबीर होणार आहे. विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघनिहाय ‘व्होटबँक डेव्हलपमेंट’चा हा कार्यक्रम असल्याची चर्चा आहे. खा. रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत आ. कुणावार यांनी योजनेचे पूर्ण स्वरूप मांडले. त्यासाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पैठणसह जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांसह, तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवकांना या योजनेची तोंडओळख करून देण्यात आली. विकास योजना विदर्भात आणि समाजसेवा मराठवाड्यात असा हा पॅटर्न असल्याचा सवाल यानिमित्ताने पुढे आला आहे. विदर्भात महत्त्वाच्या विकास योजना राज्य सरकारने देऊ केल्या आहेत. मराठवाड्यात ते प्रकल्प येणार होते. विदर्भातील नेत्यांकडून समाजसेवा शिकण्याची वेळ मराठवाड्यावर आली आहे, यावर खा. दानवे यांनी थेट उत्तर देणे टाळले. ते म्हणाले, जे चांगले आहे ते ग्रामीण पातळीपर्यंत देण्याचा प्रयत्न आहे. शासनाने देऊ केलेल्या अनेक योजना लोकांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे हा कार्यक्रम हळूहळू सर्व ठिकाणी राबविण्याचा उद्देश आहे. बैठकीला फक्त भाजपचेच आमदार बोलावले. शिवसेनेचे आमदार का नाही आले. यावर दानवे म्हणाले, सर्व मतदारसंघांसाठी हा कार्यक्रम राबविला जाऊ शकतो. माझ्या मतदारसंघात चाचणी म्हणून उपक्रम घेत आहोत. त्यानंतर पूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येईल, यामध्ये सेना-भाजप असा काहीही भेद नाही. यावेळी आ. तानाजी मुटकुळे, आ. भीमराव धोंडे, आ. संगीता ठोंबरे, आ. प्रशांत बंब, आ. संभाजी निलंगेकर, आ. अतुल सावे, आ. नारायण कुचे, आ. सुधाकर भालेराव आदींची उपस्थिती होती.
विकास योजना विदर्भात; समाजसेवा मराठवाड्यात
By admin | Published: June 15, 2016 11:59 PM