भराडी/ लासूर स्टेशन (जि. औरंगाबाद) : गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी मक्याला विक्रमी २,०५० रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला, तर दुसरीकडे सिल्लोड तालुक्यातील भराडी येथे २,१०० रुपये दराने व्यापाऱ्यांनी मका खरेदी केला. यामुळे दुष्काळात बळीराजाला दिलासा मिळाला. मका संपत आल्याने भाव वाढल्यामुळे आधीच मका विक्री करणाºया शेतकºयांनी मात्र रोष व्यक्त केला. पुढील काही दिवसांत मक्याला आणखी भाव येणार असल्याचे व्यापाºयांनी सांगितले.लासूर स्टेशन बाजार समितीच्या आजपर्यंच्या इतिहासात पहिल्यांदाच मक्याला एवढा भाव मिळाला असून, दुष्काळामुळे उत्पादन घटले अन् मालाला भाव आला, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. भाव वाढलेले असताना आवक मात्र १०० क्विंटलच्या आतच असल्याने मोजक्याच शेतकºयांना वाढलेल्या भावाचा फायदा होत आहे.लासूर स्टेशन येथील बाजार समितीमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून मक्याला दीड हजार ते १,७५० रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळत होता. मात्र, गुरुवारी झालेल्या लिलावात मक्याच्या भावाने लासूर स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इतिहासात प्रथमच २ हजारांचा दर ओलांडून तो २,०५० रुपयांवर पोहोचला. वाढलेल्या भावामुळे शेतकºयांत आनंदाचे वातावरण जरी असले तरी वाढलेल्या भावाचे लाभार्थी शेतकरी मात्र कमीच होते. मागणीच्या तुलनेत आवक घटल्याने भाव वाढल्याचे लासूर येथील व्यापारी विनोद जाजू यांनी सांगितले. एकीकडे कांद्यासाठी केलेला खर्चही कांदा विक्रीतून निघत नाही, तर दुसरीकडे हमीभावापेक्षा ३०० रुपयांहून अधिक दराने मक्याची व्यापाºयांकडून खरेदी होत आहे. भाव वाढलेले असताना शेतकºयांकडे मात्र विकायला मका नसल्यामुळे काहींनी खंत व्यक्त केली.पावसाअभावी उत्पादनात मोठी घटसध्या सिल्लोड तालुक्यातील भराडी परिसरात मक्याने उच्चांक गाठला असून, प्रतिक्विंटल तब्बल २१०० रुपये भाव मिळत असल्याने शेतकºयांना अच्छे दिन आले आहेत. मात्र, अच्छे दिन आलेल्या शेतकºयांची संख्या अंत्यत कमी आहे. कारण पावसाअभावी एकतर मोठ्या प्रमाणात उत्पादनात घट झाली असून, काही शेतकºयांनी आधीच मका विक्री केली. त्यामुळे आता मक्याची भाववाढ झाल्याने त्याचा तुरळक बळीराजाला लाभ झाला आहे. यापूर्वी सन २०१५ मध्ये मक्याला ११५० रुपये भाव मिळाला होता, तर २०१६ ला १२५०, २०१७ मध्ये १३०० आणि २०१८ मध्ये १६०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला होता. सध्या मात्र, भराडी परिसरात मक्याची खरेदी २१०० रुपये प्रतिक्विंटलने सुरू असून, वरच्या बाजारात तेजी असल्याने मक्याला सध्या अच्छे दिन आले आहेत.