हतनूर : कन्नड तालुक्यातील हतनूर व टापरगावात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून वाळूमाफियांकडून अवैधरित्या वाळू उपसा सुरू आहे. दिवसरात्र वाळूचे ट्रॅक्टर धावत असल्याने कर्णकर्कश आवाज व धुळीमुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. या वाळूमाफियांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून हतनूर परिसरातील शिवना नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळूउपसा सुरू आहे. शिवना नदीस पाण्याचा तुंबारा असूनदेखील वाळूमाफिया वाळूउपसा करीत आहेत. रात्रीच्या वेळी जास्तीत जास्त वाळू उपसा करता यावा, म्हणून वाळूमाफिया जोराने ट्रॅक्टर पळवितात. यामुळे झोपमोेड होत असल्याने गावकरी त्रस्त झाले आहेत. तसेच चोरट्या वाळू वाहतुकीमुळे प्रशासनाचा लाखो रुपयांचा महसूलही बुडत आहे. यामुळे या वाळू वाहतुकीला लगाम बसावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
चौकट
नदीला पाणी असल्याने वाळूचे भाव वाढले
शिवना व गांधारी नदीला यंदा पाणी वाहत असल्याने वाळूचे भाव गगनाला भिडले आहेत. हतनूर गावात एका ट्रिपचे ३ हजार रुपये तर परिसरातील खेड्यांमध्ये साडेतीन हजार रुपये ट्रॅक्टरची ट्रिप वाळू विकली जात आहे.
फोटो : हतनूर परिसरात होत असलेली अवैध वाळू वाहतूक.