घोणसी (जि. लातूर) : जळकोट तालुक्यातील घोणसी येथील जिल्हा परिषद शाळेतील एका शिक्षकांचे समायोजन करण्यात आले आहे़ हे समायोजन रद्द करावे, यासाठी मागणीसाठी संतप्त पालकांनी सोमवारी शाळेला कुलूप ठोकून ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.
जळकोट तालुक्यातील घोणसी येथे १९५५ साली जिल्हा परिषद शाळेची स्थापना करण्यात आली. सुरूवातीला या शाळेत इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग भरत होते. दरम्यान, विद्यार्थी संख्येत वाढ होत असल्याने सन २०१७ मध्ये चौथीचा वर्ग सुुरु करण्यात आला़ त्यानंतर शिक्षण विभागाच्या परवानगीने २०१८ मध्ये पाचवीचा वर्ग सुरु करण्यात आला़ त्यामुळे सध्या इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतचे एकूण १७१ विद्यार्थी शाळेत शिक्षण घेत आहेत़ त्यात पाचवीच्या विद्यार्थ्यांची संख्या २९ आहे़
दरम्यान, सरल पोर्टलवर झालेल्या नोंदणीत या शाळेचे इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत वर्ग समाविष्ठ झाले़ त्यानंतर संचमान्यतेच्या निकषानुसार येथील एक शिक्षक अतिरिक्त ठरला़ त्यामुळे अतिरिक्त शिक्षकाचे अन्य ठिकाणी समायोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या़ या शाळेवरील एक शिक्षक कमी होत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार म्हणून गावातील नागरिकांनी संताप व्यक्त करीत सोमवारी शाळेस कुलूप ठोकून ठिय्या आंदोलन सुरु केले आहे़ यावेळी सरपंच दत्ता घोणसीकर, शालेय समिती अध्यक्ष बालाजी गोदाजी, ज्ञानोबा मालुसरे, बब्रुवान आंब्रे, सोपान सबुचे, त्र्यंबक स्वामी, नागनाथ कांबळे, गोविंद भिसाडे, प्रदीप गोदाजी आदी उपस्थित होते़ दरम्यान, मुख्याध्यापक के़पी़ बिरादार म्हणाले, सरल पोर्टलवर पाचवीचा वर्ग दिसत नसल्याचे कार्यालयास कळविले़ परंतु, त्याची दुरुस्ती झाली नसल्याने येथील शिक्षकाचे अन्यत्र समायोजन होत आहे़
तात्पुरत्या स्वरुपात समायोजऩ़़घोणसी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या ही वाढल्याने तिथे पाचवीचा वर्ग सुरु करण्यासाठी शिक्षण विभागाने परवानगी दिली़ परंतु, सरल पोर्टलवर त्याची नोंदणी नाही़ संचमान्यतेनुसार तिथे एक शिक्षक अतिरिक्त ठरला़ त्यामुळे त्याचे अन्यत्र समायोजन करण्यात आले आहे़ सरल पोर्टलवर लवकरच दुरुस्ती करण्यात येऊन या ठिकाणी शिक्षक नियुक्त केला जाईल, असे शिक्षण विभागातून सांगण्यात आले़
समायोजन रद्द करण्याची मागणी़शाळेतील एक शिक्षक कमी झाल्यानंतर पाचवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे़ त्यामुळे सदरील शिक्षकाचे समायोजन करण्यात यावे़ हे समायोजन जोपर्यंत रद्द होणार नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन सुरुच राहणार असे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बालाजी गोदाजी यांनी सांगितले.