- राम शिनगारे औरंगाबाद : गावकऱ्यांचे सहकार्य असेल तर शाळेचा विकास होऊ शकतो हे जळगाव मेटे गावातील रहिवाशांनी दाखवून दिले आहे. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत वर्ग असलेल्या जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांसाठी सर्व प्रकारच्या पायाभूत सेवा-सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत, यासाठी गावकऱ्यांनी २०११ ते २०१९ या नऊ वर्षांच्या कालावधीत तब्बल २० लाखांहून अधिक निधी लोकवर्गणीतून जमा करून दिला आहे. या उपक्रमशीलतेमुळे शाळेचा विकास होऊन विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळत आहे.
फुलंब्री तालुक्यातील जळगाव मेटे हे ९८५ लोकसंख्या असलेले गाव आहे. या गावात इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत जि.प.ची शाळा आहे. या शाळेचा मागील ९ वर्षांत शिक्षक आणि गावकऱ्यांच्या सहकार्यामुळे कायापालट झाला आहे. या शाळेत कृतीयुक्त शिक्षण, विषय मित्र संकल्पना, शिष्यवृत्ती मार्गदर्शन, क्रीडा स्पर्धा, स्पर्धा परीक्षा, संगणक व मूल्य शिक्षण अशा विविध संकल्पनेतून शिक्षण दिले जाते. याशिवाय प्रत्येक शनिवारी दप्तरमुक्त शाळा भरविण्यात येते. या दिवशी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कोण बनेगा ज्ञानपती, संगीत शिक्षण, वादविवाद स्पर्धा, स्टार आॅफ द स्कूल, इंग्रजी शब्दांच्या भेंड्या, गीत गायन स्पर्धा हे उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती मुख्याध्यापक एन. बी. जाजेवार यांनी दिली.
२०११-१२ मध्ये आलेल्या वादळामध्ये शाळा पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती. त्यानंतर दुसऱ्याच वर्षी शाळेला नव्याने ५ वर्गखोल्या मंजूर करण्यात आल्या. त्यानंतर गावकऱ्यांच्या मदतीने शाळेने भरारी घेतली. शाळा परिसर हिरवाईने नटलेला असल्यामुळे निसर्गाच्या सान्निध्यात विद्यार्थ्यांना अध्ययन करता येते. या यशात शिक्षकांचा मोलाचा वाटा राहिला आहे. त्यामुळे शाळेला २०१५ मध्ये आयएसओ मानांकनही मिळाले. या शाळेत सध्या एन. बी. जाजेवार, टी. एस. जाधव, पी. एम. जाधव, एस. व्ही. कांबळे, आर. आर. दीक्षित, यू. पी. सरडे आणि एस. के. बडे हे शिक्षक कार्यरत आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी एम. एम. गोंदवले यांनी या शाळेला नुकतीच भेट देऊन उपक्रमाची स्तुती केली.
लोकसहभागातून ९ वर्षांत असा उभारला निधी- शाळेच्या खोल्याचे बांधकाम, मैदान सपाटीकरणासाठी २ लाख रुपये.- पिण्याचे पाणी आणि बांधकामासाठी, कूपनलिकेसाठी १ लाख २० हजार.- वृक्ष लागवड, वृक्षांसाठी ठिंबक सिंचन, लॉन, फुलबागेच्या निर्मितीसाठी १ लाख रुपये.- स्टेज, ध्यान मंदिर आदी निर्मितीसाठी ८० हजार रुपये.- शाळेच्या सुरक्षेसाठी कुंपणाच्या कामासाठी १ लाख २० हजार रुपये.- शाळेची रंगरंगोटी आणि बोलक्या भिंती बनविण्यासाठी १ लाख २० हजार रुपये.- मैदान तयार करण्यासाठी ४ लाख ५० हजार रुपये.- माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करून त्यातून डिजिटल वर्गखोल्यांसाठी २ लाख २५ हजार रुपये- गावातील गणपती, नवरात्रोत्सवाच्या शिल्लक पैशातून शाळेच्या वीज बिलासाठी ३२ हजार ७०० रुपये.- मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, हॅण्डवॉशसाठी स्टेशन १ लाख ४० हजार रुपये.- मध्यान्ह भोजनासाठी डायनिंग टेबल निर्मितीसाठी २ लाख रुपये.- वाबळेवाडी शाळेच्या धर्तीवर अंगणवाडी निर्मिती खर्चासाठी २ लाख १० हजार रुपयांचा निधी जमा करण्यात आला.
शाळेची माहितीस्थापना : १९६२वर्ग : पहिली ते आठवीशिक्षक : ७विद्यार्थी : १७४गावची लोकसंख्या : ९८५