वैजापूर : बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गालगत कृषी समृद्धी केंद्र (नवनगर) विकास करण्याचे काम गुरुवारी जांबरगाव शिवारात नागरिकांनी बंद पाडले.
जांबरगाव शिवारात गट क्रमांक २४५ ही गायरान जमीन आहे. ही जमीन अनेक वर्षांपासून ग्रामपंचायतीने भूमिहीन लोकांना उदरनिर्वाहासाठी कसण्यास दिली होती. या जमिनीवर १५ लोक पिके घेऊन ती कसत होती. येथून गेलेल्या समृद्धी महामार्गासाठी ही गायरान जमीन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या ताब्यात देऊन नावे करण्यात आली. या शिवारात कृषी समृद्धी केंद्र (नवनगर) उभारण्यात येणार आहे. या नवनगरचा विकास करण्यासाठी रस्ते विकास महामंडळाने गट क्रमांक २४५ मधील १० हेक्टर जमीन महाराष्ट्र राज्य वखार महामंडळास भाडेतत्त्वावर दिली. वखार महामंडळाने या जमिनीवरील झाडे, घरे व अन्य अतिक्रमण काढून घेतले. त्यानंतर विकासाचे काम करण्यासाठी गुरुवारी तयारी सुरू केली. मात्र, ही जमीन कसणाऱ्या नागरिकांनी हे काम बंद पाडले. त्यामुळे वखार महामंडळाचे अधिकारी तेथून निघून गेले.
कोट..
जांबरगाव शिवारातील गट क्रमांक २४५ मधील १० हेक्टर जमीन रस्ते विकास महामंडळाकडून भाडेतत्त्वावर वखार महामंडळाने घेतली आहे. या जागेवर शेतकऱ्यांसाठी कृषी समृद्धी केंद्र उभारण्यात येणार आहे.
-राजेंद्र कुमार भिसे, उपमहाव्यवस्थापक, वखार महामंडळ
कोट..
वखार महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी कुठलीही पूर्वसूचना व नोटीस न देता घरे पाडली. कपाशी, गहू आदी पिके जेसीबीच्या सहाय्याने उद्ध्वस्त केली. १९७९ पासून ही माणसे जमीन कसत होती. त्यामुळे ३५ लोकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे हे काम बंद पाडले आहे.
- सिद्धार्थ तेजाड, तालुकाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी
कोट
ग्रामपंचायतीने भूमिहीन लोकांना ही जमीन कसण्यासाठी दिली होती. गेल्या ३० वर्षांपासून या जमिनीवर आमचा उदरनिर्वाह चालत होता. त्यामुळे आमचे खूप नुकसान झाले आहे.
-भागीनाथ साळवे, शेतकरी, जांबरगाव
फोटो : जांबरगाव शिवारात नागरिकांनी नवनगरचे काम बंद पाडले.
250221\img-20210225-wa0246_1.jpg
जांबरगाव शिवारात नागरिकांनी नवनगरचे काम बंद पाडले.