आडूळ : मागील चार महिन्यांपासून आडूळ येथील महावितरण कंपनीच्या कामधकाऊ वृत्तीमुळे परिसरातील ३५ गावांतील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असून, महावितरणचे कर्मचारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे नागरिकांना अंधारात रात्र काढावी लागत असून, वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी निवेदनाद्वारे त्रस्त नागरिकांनी महावितरणकडे केली आहे.
आडूळ येथील ३३/११ के.व्ही. विद्युत उपकेंद्रातून परिसरातील ३५ गावांना वीजपुरवठा केला जातो. मात्र, मागील चार महिन्यांपासून उपकेंद्रात सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे बिघाड होत असल्याने, वीजपुरवठा तीन-तीन दिवस खंडित राहत आहे. यामुळे आडूळ, रजापूर, देवगाव, ब्राह्मणगाव, गेवराई, घारेगाव, एकतुनी, दाभरूळ परिसरातील अनेक गावांतील ग्रामस्थांचे हाल होत आहे. ३५ गावांतील ग्राहकांना सेवा देण्यासाठी येथील कार्यालयात अपुरी कर्मचारी संख्या असून, एका लाइनमनकडे पाच ते सहा गावांचा अतिरिक्त कारभार सोपविण्यात आला आहे. आडूळ गावाची लोकसंख्या बारा हजारांच्या आसपास असून, फक्त येथे एकच लाइनमन काम सांभाळत आहे. त्यामुळे सध्या वीज ग्राहकांना सुरळीत सेवा मिळत नाही. त्यामुळे महावितरणने त्वरित येथील समस्या सोडवावी, अशी मागणी डॉ.गजानन आगलावे, हारुण पठाण, गणेश काळे, संदीप सुरसे, जितेंद्र वायकोस, गजानन मिरगे, विठ्ठल अंतरकर, शेख नजमोद्दीन यांनी केली.
----
मान्सूनपूर्व कामे खोळंबली
महावितरणने मान्सूनपूर्वची कामे केली नसल्याने विजेच्या खांबावर, तसेच गावातील रोहित्रामध्ये वारंवार बिघाड होत असल्याने, सलग तीन ते चार दिवस वीजपुरवठा खंडित राहत असल्याने वीजग्राहक त्रस्त झाले आहेत. या व्यतिरिक्त गावात सध्या दररोज सकाळी ६ ते ९:३० वाजेपर्यंत भारनियमन केले जाते. त्यातही दिवसभरात किंवा रात्री-अपरात्री अनेक वेळा वीजपुरवठा खंडित होत असल्याने, ग्रामस्थ महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराला वैतागले आहेत.
----
विद्युत तारा व खांब झाले जीर्ण
विद्युत उपकेंद्राचे सन १९७२ मध्ये कामकाज पूर्ण करण्यात आले, तेव्हापासून आजपर्यंतच्या ५० वर्षांच्या कालावधीत जीर्ण झालेल्या विद्युत तारा, तसेच खालून गंजलेले खांब एकदा ही बदलण्याची तसदीही महावितरणने घेतली नाही. सध्या वादळी-वाऱ्याचे दिवस असल्याने हे वीज खांब कोणत्याही क्षणी खाली कोसळून भविष्यात मोठी दुर्घटना भीती निर्माण झाली.
---
गावातील विद्युत रोहित्राची क्षमता कमी व भार जास्त असल्या कारणाने वारंवार रोहित्र जळत आहे, तसेच एका फिटरवर पाच ते सहा गावांचा अतिरिक्त भार असल्याने वीज पुरवठा खंडित होत आहे.
- महेश कुंभारे, सहायक अभियंता, महावितरण.