खुलताबाद : तालुक्यातील झरी-वडगाव येथे कोरोना रोखण्यासाठी गावकऱ्यांनी कंबर कसली आहे. या गावातील सर्वच नागरिकांची अर्थात ५६२ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. यात १३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत ८० जणांना लसीकरण करण्यात आले आहे.
झरी-वडगाव ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच करणसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली गाव कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. गावातील सर्वच नागरिकांची कोरोना तपासणी करण्यात आली. ५६२ जणांच्या तपासणीत १३ जण कोरोनाबाधित आढळून आले, तर गावातील ४५ वर्षांवरील ८० जणांना लस दिली गेली. वैद्यकीय अधिकारी डॉ. मेहेर, डॉ. विशाल ढेपे, आरोग्य कर्मचारी व उपसरपंच विठ्ठल राऊत, कोकिळाबाई चंडवाडे, मुख्याध्यापक एस. एन. राजपूत, सहशिक्षक शेळके, प्रमिला राऊत, लताबाई छापले, ग्रामसेवक बनसोडे, संदीप राऊत, सुरेश मोरे, कल्याण मेहेर आदी परिश्रम घेत आहेत.
फोटो कँप्शन : खुलताबाद तालुक्यातील झरी येथे संपूर्ण गावाची कोरोना चाचणी करताना आरोग्य विभागाचे कर्मचारी.