सखाराम शिंदे ल्ल गेवराईदुष्काळामुळे ग्रामीण भागातील विहिरी, बोअरने तळ गाठला. यामुळे टँकरची मागणी वाढली. एकही ग्रामस्थ पाण्यावाचून राहू नये, यासाठी प्रशासनाने मागेल त्या गावाला टँकर दिले. आजमितीला गेवराई तालुक्यात १३८ टँकरद्वारे ११० गावे, ११५ वाड्या अशा एकूण २२५ ठिकाणी पाणीपुरवठा केला जात आहे. परंतु टँकरचे पाणी अपुरे पडत असल्याची ओरड ग्रामस्थांमधून होत आहे.चौथ्या वर्षीही दुष्काळ मुक्कामी असल्याने पाणीटंचाईची भयावह स्थिती तालुकाभरात आजही पहावयास मिळत आहे. गेवराई तालुक्यातील २२५ वाड्या, वस्ती, गावांना टँकरद्वारे २९४ खेपा दररोज केल्या जात आहेत. त्यातून जवळपास दोन लाख लोकांची तहान भागवली जात आहे. परंतु हा प्रयत्नही असफल ठरतो की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण अंघोळ, घरामध्ये वापरासाठी पाणी व पिण्यासाठी पाणी अशा तीन पद्धतीने पाण्याचा वापर होतो. टँकरने फारतर फार पिण्याचे पाणी उपलब्ध होते. वापरायला अत्यल्प पाणी मिळते. टँकर दररोज येईल, याची शाश्वती नाही. त्यामुळे मिळणारे तोकडे पाणी कसेबसे दोन दिवस त्यांना वापरावे लागते. आता पाणीटंचाई आणखी गंभीर झाली आहे. विकतचे टँकर मिळणेही कठीण झाले आहे. जे टँकर उपलब्ध आहेत, त्यांचे दरही चढे आहेत. दुष्काळात शेतकऱ्यांच्या हाताला उत्पन्न आले नाही. थोडेफार पैसे आहेत ते पाण्यावर खर्च करावे लागत आहेत. दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास तर गेलाच आता पैसेही चालले आहेत, अशी बिकट परिस्थिती आहे.पाण्याची सोय : ४९ विहिरी केल्या अधिग्रहित१३८ खाजगी टँकर चालू आहेत. यात धुमेगाव, कोळगाव, राजपिंपरी, धोंडराई, मादळमोही, सिरसमार्ग, सिरसदेवी, मानमोडी, पौळाचीवाडी, माटेगाव, रसुलाबाद, मन्यारवाडी, बेलगुडवाडी, जातेगाव, पाडळसिंगी, गौंडगाव, चकलांबा, उमापूर, सावरगाव, पाचेगावसह अनेक गावांना पाणी पुरवठा केला जात आहे. गेवराई येथील व गढी येथील पाण्याच्या टाक्यावरुन टँकर भरले जात आहेत. तसेच ४९ विहिरी टँकरसाठी अधिग्रहीत केल्या आहेत तरी देखील आजमितीला अनेक गावांत पाणी टंचाई भासत आहे. जून उजाडला असला तरी टँकरची संख्या मात्र दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आगरनांदूर व मालेगाव या दोन गावांचे प्रस्ताव दाखल असल्याचे तहसीलदार पवार म्हणाले.
१३८ टँकर देऊनही गावे तहानलेली
By admin | Published: May 31, 2016 11:12 PM