नाचनवेल : ‘गाव तिथे एसटी, रस्ता तिथे एसटी’ हे ब्रीदवाक्य धारण करून गावोगावी प्रवाशांच्या सोयीसाठी धावपळ करणारी एसटी विभागाला मात्र, आजही नाचनवेल-बाबरा-कान्होरी या गावांचा विसर पडला आहे. स्वातंत्र्याची पंचाहत्तरी होत आली. तरी या गावात अद्यापही एसटी सेवेची प्रतीक्षा करावी लागत आहे.
माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या प्रयत्नांतून नव्याने बांधण्यात आलेल्या कान्होरी, नाचनवेलमार्गे औरंगाबाद-पाचोरा राज्यमार्ग क्रमांक ४८ वरून एसटीची चाके फिरण्याची प्रतीक्षा केली जात आहे. या मार्गावरील कान्होरी, मालोद्याची वाडी, कबाड्याची वाडी, लिहा, बाभूळगाव, कोळवाडी, पेंडगाव, पवार वस्ती या गावातील नागरिकांना एसटी सेवेपासून वंचित राहावे लागत आहे.
खान्देशातील पाचोरा व मराठवाड्याच्या सोयगाव, सिल्लोड तालुक्याला जोडणारा हा सर्वांत जवळचा मार्ग आहे. या मार्गावर एसटीची सेवा सुरू झाल्यास नागरिकांचा वेळ आणि पैशांची बचत होईल. राज्य परिवहन महामंडळाकडून काही दिवसांपूर्वी या मार्गाचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यानंतर कोणतीच हालचाल झाली नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन एसटी सेवा सुरू करावी, अशी मागणी प्रवाशांतून होऊ लागली आहे.
-----
नागरिक म्हणतात...
घाटनांद्रा ते फुलंब्री हे अंतर अंधारी-आळंदमार्गे ६५ किमी असून बाबरा-कान्होरीमार्गे प्रवास केल्यास हेच अंतर केवळ ४२ किमी राहते. सद्य:स्थितीत एसटीच्या सर्व बस अंधारीमार्गे धावतात. त्यामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड बसतो. परिवहन महामंडळाकडे मागणी करूनही प्रतिसाद मिळत नाही. दोन प्रादेशिक विभागांना जोडणाऱ्या या नवीन मार्गावर एसटी विभागाला अपेक्षेपेक्षा जास्त उत्पन्न मिळेल.
- सुभाष मनगटे, शेलगाव, ग्रामस्थ.
घाटनांद्रा गावातून सिल्लोड, कन्नड, सोयगाव व पाचोरा या आगारांच्या बस धावतात; परंतु एकही फेरी कोळवाडी-बाबरा-कान्होरीमार्गे नाही. या गावांतील लोकांना प्रवास करायचा असल्यास आजही खाजगी वाहनाने जावे लागते किंवा पायी चालत घाटनांद्रा, बाबरा, नाचनवेल ही मोठी गावे गाठावी लागतात. हा राज्यमार्ग सर्वच तालुक्यांच्या सीमावर्ती भागांतून जातो. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी या रस्त्याने बससेवा सुरू करावी.
-राहुल मोरे, ग्रामस्थ, घाटनांद्रा