विकास राऊत
औरंगाबाद : जिल्ह्यात बेसुमार वाळू उपशामुळे पर्यावरणाचे नुकसान होत आहे. वाळू उपशामुळे जिल्ह्यातील लहान - मोठ्या नद्यांचे ‘नदीपण’ हरवत असून अनेक गावांना पुराचा सामना करावा लागल्याचे दिसून आले आहे.
बेसुमार वाळू उपशामुळे पर्यावरणाची कधी न भरून निघणारी हानी होत आहे. शेतजमिनींसह भूजल पातळीवर देखील याचा परिणाम होत आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात गोदावरी ही मुख्य नदी आहे. याशिवाय पूर्णा, शिवना, खाम याही नद्या आहेत. दुधा, गलहती आणि गिरजा या गोदावरीच्या उपनद्या आहेत. नदी पात्रांच्यालगत सुमारे २ लाख एकर पीकक्षेत्र आहे. सर्व मिळून ४३ वाळूचे पट्टे या नदींच्या पात्रात आहेत.
या नद्यांच्या पात्रालगत असलेले वैजापूर, गंगापूर, पैठण, सिल्लोड, कन्नड, फुलंब्री तालुक्यांत मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा होतो आहे. फुलंब्रीतील गिरजा नदीतील वाळू उपशामुळे तीन वर्षांत दोन वेळा महापुराचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला. त्यावर महसूल आणि पोलीस प्रशासनाने पर्यावरण समतोल राखण्याच्या दृष्टीने केलेले प्रयत्न अपयशी ठरले आहेत. राज्यस्तरीय पर्यावरण मूल्यांकन प्राधिकरणाने दिलेल्या परवानगीच्या विरोधात जाऊन मोठ्या प्रमाणात वाळू उपसली जात आहे. सिल्लोड तालुक्यातील ८, गंगापूर १, कन्नड ४, वैजापूर ६ तर फुलंब्री तालुक्यातील एका असे २० नदी पात्रातील वाळूठेके परवानगीसाठी पर्यावरण समितीकडे आहेत. यंदा जास्तीचा पाऊस झाल्यामुळे नदीपात्रांमध्ये मुबलक पाणी आहे. त्यामुळे वाळूउपशाला पर्यावरण समितीकडून मंजुरी मिळण्याची शक्यता कमीच असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले.
कोट...
पर्यावरण तज्ज्ञांचे मत असे
पर्यावरण तथा जल आणि सिंचन तज्ज्ञ प्रा. एच. एम. देसरडा यांनी सांगितले, वाळूपट्टे देतांना मोठा भ्रष्टाचार होत असून पर्यावरणाबाबत कुणीही विचार करीत नाही. भूजल कमी होण्याचे, जलतुटवडा जाणवण्यामागे नद्यांमधील वाळू उपसण्याचे कारण आहे. वाळू नद्यांचा श्वास आहे. राजकीय पाठबळामुळे पर्यावरणरक्षक, अधिकाऱ्यांना मारहाण होण्याच्या घटना घडत आहेत. परिणामी पर्यावरणीय ताळमेळ संपविला जात आहे. वाळूचे पर्यावरण दृृष्टीने मोठे महत्त्व आहे. निसर्ग प्रक्रियेमध्ये वाळू तयार होते. त्याला वर्षानुवर्ष लागतात. जिल्ह्यातील नापिकी, दुष्काळ आणि भूजल पातळी कमी होण्यास बेकायदेशीररीत्या होणारा वाळूउपसा जबाबदार आहे.