औरंगाबाद : वाळूज एमआयडीसीमध्ये ९आॅगस्ट रोजी झालेली तोडफोड आणि जाळपोळ ही मुद्दामहून वैयक्तीक वादातून कंपन्यांना धडा शिकविण्यासाठी करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. या तोडफोडीशी मराठा क्रांती मोर्चाचा संबंध अद्याप दिसून आला नाही, असे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
पोलीस आयुक्त म्हणाले की,मराठा क्रांती मोर्चाने ९ आॅगस्ट रोजी आरक्षणाच्या मागण्यासाठी राज्यस्तरीय बंद पुकारला होता. औरंगाबाद शहरात हा बंद अत्यंत शांततेत पार पडला. आंदोलकांनी केलेल्या सहकार्यामुळे अनेक ठिकाणी दोन समाजात होणारे लहान-मोठ्या तणावाचे प्रसंग टाळता आले. या आंदोलनादरम्यान मात्र वाळूज एमआयडीसी परिसरातील विविध कारखान्यामध्ये काही समाजकंटकांनी तोडफोड, जाळपोळ केली. एवढेच नाही तर त्यांनी तेथील मालही लुटून नेला. याप्रकरणी सात गुन्हे नोंदविण्यात आले. या तोडफोडीच्या तपासात आतापर्यंत मात्र मराठा क्रांती मोर्चाचा संबंध आढळून आला नाही. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या मराठा क्रांती मोर्चात हे समाजकंटक घुसले. त्यांनी आंदोलनाचा गैरफायदा घेत ही तोडफोड केल्याचे दिसून येत आहे.
आतापर्यंत ५३ समाजकंटकांना अटकया तोडफोड, जाळपोळप्रकरणी पोलिसांनी आजपर्यंत ५३ जणांना अटक केल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले. ते म्हणाले की, विविध कंपन्यांनी दिलेले सीसीटिव्ही फुटेज,पोलीस आणि सामान्य नागरीकांनी आंदोलकाचे मोबाईलवर छायाचित्रण केले, फोटो काढले, त्याआधारे ही कारवाई सुरू आहे. जो तोडफोड करताना आढळला, त्यांनाच अटक केली जात असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.