छत्रपती संभाजीनगर : वेश्या व्यवसायातील कुख्यात तुषार राजपूत याच्या मोबाइलमध्ये अनेक बड्या राजकीय नेत्यांसह व्हीआयपीचे नंबर असून, त्याचे जाळे मराठवाडाभर पसरले असल्याचे उघडकीस आले आहे.
व्हीआयपी कस्टमरला हवा तशा पद्धतीचा पुरवठा करण्यासाठी त्याने राज्यभरातील या व्यवसायाशी संबंधितांशी कनेक्टिव्हिटी ठेवलेली होती. त्यास अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार (पिटा) दोन वर्षांची शिक्षाही झालेली आहे. या शिक्षेला आव्हान देऊन जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याने पुन्हा हाच व्यवसाय सुरू करीत मोठ्या प्रमाणात संपत्ती कमाविल्याचे स्पष्ट होत आहे. सिडको पोलिसांनी १३ जानेवारी रोजी एन-७ येथील कुंटणखान्यावर छापा टाकल्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवरील कनेक्शन असलेले देहविक्री व्यवसायाचे रॅकेट उघडकीस आले.
पहिल्या छाप्यातील प्रदीप पवार याच्यासह एका महिलेला पकडले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार कुख्यात तुषार राजपूतचा १६ जानेवारीला बीड बायपासवरील सेनानगरातील अड्डा उद्ध्वस्त केला. त्याठिकाणी आंतरराष्ट्रीय पीडितांचीही सिडको पोलिसांनी सुटका केली. तुषारच्या माहितीवरून देशभर नेटवर्क असलेली पुण्यातील लेडी डॉन कल्याणी देशपांडेला बेड्या ठोकल्या.
मात्र, कल्याणी पोलिसांना विशेष माहिती देत नसून, तिचा राजपूतला पीडित महिलांचा पुरवठा करण्यापर्यंतच संबंध असल्याचे चौकशीत समजले. राजपूतने छत्रपती संभाजीनगरातून मराठवाड्यातील व्हीआयपी ग्राहकांचे जाळे तयार केले होते. त्याच्या मोबाइलमधील माहितीनुसार त्याच्या संपर्कात मराठवाड्यातील राजकीय नेते, प्रतिष्ठित अधिकाऱ्यांसह विविध ठिकाणच्या एजंटांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे नंबर सेव्ह असलेल्या व्यक्तीविषयी पीडितांची तक्रार नसल्यामुळे पोलिसांना कायदेशीर बाबी तपासूनच संबंधितांना चौकशीसाठी बोलावता येणार आहे.
सिडको पोलिस मोक्का लावणारएकूण आरोपींची संख्या ९ असल्यामुळे संघटित गुन्हेगारीविषयी कायदा असलेला मोक्का पाेलिस लावणार आहेत. हे कलम लावल्यानंतर आरोपींच्या अडचणीत मोठी वाढ होईल. मुख्य आरोपी राजपूतसह इतरांना जामीनही मिळणे कठीण होईल.
हर्सूलमध्ये राणी अन् आशावर लक्षहर्सूल पोलिस ठाण्यात बांगलादेशातून आणलेल्या अल्पवयीन मुलीच्या प्रकरणात पुण्यातील बुधवार पेठेतील आंटी आशा हसन शेख हिला अटक केली, तर तिच्यामार्फत छत्रपती संभाजीनगरात पीडितेला पाठविणारा मूळव्याधीचा डॉक्टर प्रशांत रॉयलाही बेड्या ठोकल्या. त्याच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहणारी राणी हीसुद्धा पुण्यातील प्रसिद्ध ‘आंटी’ आहे. आशाही बंगाली असून, तिलाही लहानपणीच वेश्या व्यवसाय आणले गेले आहे. नंतर तिने वय झाल्यानंतर खरेदी-विक्रीचा व्यापार सुरू केला. त्या प्रकरणातही मोठी अपडेट समोर येण्याची शक्यता आहे.