ऑनलाईन लोकमत / श्यामकुमार पुरे
औरंगाबाद / सिल्लोड, दि.२७ : परराज्यात प्रचंड मागणी असलेल्या सिलोड तालुक्यातील हिरव्या मिर्चीवर रोग पडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अल्टरनेरीया, कार्लो, सार्फोसोरा अशा विषाणूमुळे हा रोग पडला आहे. याची लागण झाल्याने झाडांची पाने पिवळी पडून मिर्चीचे नुकसान होत आहे.
सिलोड तालुक्यात यावर्षी जवळपास १ हजार ३८२ हेक्टर क्षेत्रावर मिर्ची लागवड करण्यात आली आहे. सुरुवातीच्या तोडनीतील मिर्चीस ६५०० रुपये भाव होता आज तो घसरून ३१०० झाला आहे. यामुळे लवकर लागवड केलेल्या शेतकऱ्याचा खर्च सुरुवातीच्या तोडीने निघाला आहे. मात्र, उशीरा लागवड करण्यात आलेल्या मिरचीवर या रोगाचे सावट आहे. यातच भाव गडगडले आहेत यामुळे मिर्ची उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.
बाजारपेठे दररोज १०० टनाची आवक असलेल्या शिवना, गोळेगाव, सिल्लोड, आमठाना, भराड़ी, बोरगाव सर्कल मध्ये उत्पादित होणा-या मिर्चीस जबलपूर, गोंदिया, कटनी येथून मागणी आहे. तसेच महाराष्ट्रातील वाशी, नागपुर, पुणे, नाशिक, मुंबई मधील मोठ्या बाजारपेठे मधूनही नियमित मागणी असते.
मावा तुडतुडे नियंत्रणात आणावेएका झाडावर व्हायरस द्वारे रोग आला कि , त्याला दुसऱ्या झाडावर पसरविण्याचे काम मावा तुडतुडे करतात. यामुळे आधी मावा तुडतुडे नियंत्रणात आणावे. यासाठी तज्ञाच्या सल्याने औषध फवारणी करावी. मोठ्या प्रमाणात झाडावर रोग असल्यास ते झाड उपटून त्याला जमिनीत गाडावे. - प्रकाश उगले, उपविभागीय कृषी अधिकारी, सिल्लोड.