औरंगाबाद : कोरोनाच्या काळात रक्तामांसाचे नातेवाईक व ओळखीचेही पाठ फिरवून गेल्याची उदाहरणे समोर येत आहेत. मात्र, अनोळखी रुग्णावर महिनाभरापासून उपचार व देखभालीतून माणुसकीचे अनोखे दर्शनही घडले आहे. घाटीच्या वॉर्ड १९ मध्ये निवासी डॉक्टर, परिचारिका दानशूरांच्या मदतीने त्याच्यावर औषधोपचार करीत असून समाजसेवा अधीक्षक त्याच्या पुनर्वसनासाठी नातेवाईकांचा शोध घेत आहेत.
रस्ता अपघातात हाताचे फॅक्चर, मणक्यांचा व फुफ्फुसाच्या त्रासाने ग्रस्त रुग्ण १०८ रुग्णवाहिकेने आणून सोडला. तो रुग्ण वॉर्ड १९ मध्ये भरती झाला तेव्हापासून त्याच्याकडे कुणीही फिरकले नाही. तरीही इन्चार्ज माधुरी कुलकर्णी, डॉ. वैदेही शिर्शेकर, डॉ. अनिता कंडी, डॉ. अनिता खंडोबा, डॉ. पायल डोंगरे हे विभागप्रमुख डॉ. सरोजिनी जाधव, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश हरबडे यांच्या मार्गदर्शनात या रुग्णावर औषधोपचार करीत आहे. नातेवाईकांचा शोध सुरू असल्याचे समाजसेवा अधीक्षक सत्यजित गायसमुद्रे यांनी सांगितले.