- विकास राऊत
औरंगाबाद : जिल्ह्याला पर्यटन, दळणवळण, नागरी सेवा-सुविधा आणि औद्योगिक क्रांतीमध्ये अग्रेसर करण्यासाठी २०१० मध्ये जिल्हा प्रशासनाने तयार केलेले ‘व्हिजन डॉक्युमेंट २०२०’ इच्छाशक्तीअभावी अांधळे झाले आहे. कागदावरच राहिलेल्या या डॉक्युमेंटचा (दस्तावेज) सध्या काहीही विचार होत नसून १६ महिन्यांवर २०२० साल आले आहे. तरीही नागरी सुविधांशी निगडित यंत्रणा याबाबत काहीही विचार करताना दिसत नाही.
दहा लाख कुशल मनुष्यबळ, तसेच अडीच लाखांहून अधिक रोजगारनिर्मिती करण्यासोबतच कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करून जिल्ह्याचा कायापालट करण्याचे उद्दिष्ट ठरवून तयार करण्यात आलेले ‘व्हिजन-२०२०’ आता कालबाह्य झाल्यासारखे आहे. जिल्ह्याचे व्हिजन डॉक्युमेंट तत्कालीन जिल्हाधिकारी कुणालकुमार यांच्या काळात तयार करण्यात आले होते. त्यांच्या बदलीनंतर जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी त्याकडे लक्ष दिले, परंतु त्यांच्या बदलीनंतर जिल्हा प्रशासनाला त्या व्हिजनकडे लक्ष देता आले नाही.
‘व्हिजन-२०२०’चा मसुदा तयार करण्याचे काम जिल्हा प्रशासनाने २०१० मध्ये हाती घेतले होते. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी विविध सरकारी यंत्रणा, स्वयंसेवी संस्था, तज्ज्ञ मंडळी यांच्या मदतीने मसुदा तयार केला होता. जिल्ह्याचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यासाठी विविध क्षेत्रातील १६ तज्ज्ञ, अधिकारी व नागरिकांच्या समित्यांची स्थापना करण्यात आली होती. सरकारी यंत्रणा, नागरिक, लोकप्रतिनिधी यांच्या बैठका व कार्यशाळा घेतल्या. सर्वांच्या मतांचा अंतर्भाव डॉक्युमेंटमध्ये करण्यात आला होता. ते व्हिजन औरंगाबाद जिल्ह्याचे असले तरी त्याचा प्रत्यक्षात फायदा शहर व मनपा हद्दीला होणार होता. शहराची लोकसंख्या सध्या १५ लाखांच्या पुढे सरकली आहे. झालर क्षेत्रातील २६ गावांतही बांधकामे वाढली आहेत. आगामी काळात ही गावे प्राधिकरणाच्या रेट्याखाली येतील. त्यामुळे वाढणाºया लोकसंख्येला सुविधा देण्याची जबाबदारी पालिका व प्राधिकरणावर असणार आहे. यासाठी ‘व्हिजन-२०२०’ डॉक्युमेंट महत्त्वाचे ठरले असते; परंतु त्याकडे मागील आठ वर्षांत दुर्दैवाने दुर्लक्ष झाले.
मनसे तयार करणार शहराचे ‘ब्ल्यू प्रिंट’महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे बुधवारपासून मराठवाडा दौ-यावर येत असून, ३० आॅगस्ट रोजी शहरात निमंत्रितांसोबत आयोजित परिसंवादात ‘औरंगाबादची ब्ल्यू प्रिंट’ यासंदर्भात चर्चा केली जाणार आहे. शहरात १९ जुलैला राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मेळावा झाला. महिनाभरात दुस-यांदा ते मराठवाड्याच्या दौºयावर येत आहेत. पुण्याहून २९ आॅगस्टला राज ठाकरे औरंगाबादला येतील. शहरात ३० आॅगस्टला त्यांच्या उपस्थितीत सकाळी पक्ष प्रवेश सोहळा, पदाधिकारी बैठक, नवीन नियुक्त्या आदी कार्यक्रम होणार आहेत. सायंकाळी शहरातील एका हॉटेलमध्ये ‘औरंगाबाद व्हिजन’ हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील २०० लोकांना निमंत्रित करण्यात आले आहे. कार्यक्रमात प्रामुख्याने शहराच्या ब्ल्यू प्रिंटसंदर्भात चर्चा होणार आहे. निमंत्रित लोकांशी चर्चा करून शहराचे ब्ल्यू प्रिंट तयार करण्यात येणार असल्याची माहिती मनसेच्या पदाधिका-यांतर्फे देण्यात आली.
मनपा, प्रशासनाने एकत्रित काम करावे‘व्हिजन-२०२०’ याबाबत मनपा, जिल्हा प्रशासनाने एकत्रित काम करणे गरजेचे होते. मुळात शहराला अग्रेसर करण्यासाठी मनपाची भूमिका महत्त्वाची असते. व्हिजन डॉक्युमेंट समोर ठेवून पालिका काहीही निर्णय घेत नाही. शहराचा विचार करीत नाही. शहर, जिल्हा विकासासाठी जेव्हा एखादे मॉडेल तयार होते, तेव्हा त्यासाठी अर्थसंकल्पात अनुदानाची तरतूद करावी लागते. त्यानुसार कामांचे नियोजन झाले तर व्हिजनला ‘दृष्टी’ मिळते, असे मत सेवानिवृत्त सनदी अधिकारी के.बी. भोगे यांनी व्यक्त केले.