पैठण : जायकवाडी धरणाच्या जलाशयात आज सकाळी महाकाय मगरीचे दर्शन धरणावर काम करणाऱ्या तांत्रिक विभागाच्या कर्मचाऱ्यांना झाले. महाकाय मगरीचे दर्शन झाल्याने जलाशयाच्या काठावरील शेतकरी व मच्छीमारांची भितीने गाळन उडाली आहे.
दोन वर्षाच्या कालावधी नंतर पुन्हा मगर प्रकट झाल्याने नाथसागर जलाशयात मगरीचे वास्तव्य असल्याचे अधोरेखित झाले आहे. जायकवाडी धरणावर तांत्रिक विभागामार्फत नियमित कामे सुरू असून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दरवाजा परिसरात आज सकाळी ११ वाजेच्या दरम्यान जलाशयात मगरीचे दर्शन झाले. यानंतर पुन्हा धरण नियंत्रण कक्षाच्या पाठिमागे धरणावरील काही कर्मचाऱ्यांना मगर दिसली.
दोन वर्षानंतर पुन्हा मगर दर्शनसन २०१५ ला परभणी जिल्हात सापडलेली मगर वनखात्याने जायकवाडी धरणात आणून सोडली होती. वनखात्याच्या या कृतीस जायकवाडी प्रशासनासह स्थानिक नागरिकांनी मोठा विरोध दर्शविला होता. या नंतर सन २०१७ ला ८ नोहेंंबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास महाकाय मगर पैठण ते दक्षिण जायकवाडी रस्त्यावर फिरताना आढळून आली होती.पैठण येथील दिलीप सोनटक्के, जालिंदर आडसूळ, राजू गायकवाड, साहेबा ढवळे आतिष गायकवाड आशिष मापारी या तरूणांनी मोठे धाडस करीत या मगरीस जेरबंद करून वन खात्याच्या हवाली केले होते. वनखात्याने दोन दिवसानंतर मगरीस नागपूर येथील पेंच अभयारण्यात हलविले होते. या नंतर मगर नाथसागरात प्रकट झाली नाही दरम्यान बुधवारी परत एकदा दोन वर्षानंतर मगरीचे दर्शन झाले आहे.
नाथसागरात अनेक मगर असण्याची शक्यतानाथ सागरात सन २००६ च्या महापुरानंतर बँकवाटर परिसरात सातत्याने मगर दर्शन होत आहे. २००६ मध्ये मच्छीमारांच्या जाळ्यात मगरीचे पिल्ले आले होते. हे पिल्ले पुन्हा वनखात्याने नाथसागरात सोडले होते. साधारणपणे गोड्या पाण्यातील मगर नोहेंबर महिण्यात जलाशया बाहेर येऊन अंडे देते. एका वेळी २० ते २५ अंडे मगर देते. नोहेबर २०१७ ला जायकवाडी धरणाच्या मत्सबीज केंद्राच्या निर्जन भागातून ही मगर बाहेर पडताना नागरिकांच्या निदर्शनास आली होती. या मुळे या मगरीने या भागात अंडे दिले असावेत असा अंदाज वर्तविण्यात येत होता. या शिवाय २००६ च्या महापुरा प्रमाणेच यंदाच्या महापुरात अनेक मगरी जायकवाडी धरणात पुरासोबत आल्या असेही काही जणांचे म्हणने आहे. या मुळे नाथसागरात अनेक मगरी असल्याचे बोलले जात आहे.