कृषी योजनांचा घेतला आढावा : दौऱ्याबाबत कृषी विभागाकडून गुप्तता
---
औरंगाबाद : राज्याचे कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी शनिवारी राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प कार्यालयाच्या सभागृहात विभागातील औरंगाबाद, बीड, जालना या तिन्ही जिल्ह्यांतील कृषी योजनांचा आढावा घेतला. फरदड मुक्त अभियान, पुढील हंगामासाठी सोयाबीन उपलब्धता, विकेल ते पिकेल, स्मार्ट योजना व इतर योजनांचा आढावा घेत कामकाज सुधारण्याच्या सूचना कृषी विभागाला दिल्या.
शहरातील दोन बाजारांना रविवारी भेट देऊन ग्राहक व शेतकऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर शेंद्रा येथील दोन कृषीप्रक्रिया उद्योगांना भेटी दिल्या. टोनगाव येथे जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या बायोगॅस सयंत्र तसेच योजनेतील नव्या विहिरीची पाहणी कृषी आयुक्तांनी केली. शरणापूर येथील देवगिरी महिला शेतकरी बचत गटामार्फत कार्यान्वित देवगिरी तेल उद्योगाला भेट दिली. पळसगाव येथील घृष्णेश्वर शेतकरी उत्पादक कंपनीसा भेट देऊन कसाबखेडा येथे खरीप हंगामासाठी सोयाबीन ठेवणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतावर सोयाबीनची पाहणी केली. शेंदुरवादा येथील भेंडी निर्यात प्रकल्पाविषयी चर्चा केली. यावेळी जिल्ह्याचे पालक संचालक तथा आत्माचे संचालक किसनराव मुळे, कृषी सहसंचालक दिनकर जाधव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे यांची उपस्थिती होती, अशी माहिती जिल्हा कृषीविकास अधिकारी आनंद गंजेवार यांनी दिली.
---
फोटो ओळ : शरणापूर येथे देवगिरी महिला शेतकरी बचत गट चालवत असलेल्या तेल घाणा उद्योगाला कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी भेट दिली.