छत्रपती संभाजीनगर : शहरातून मोठ्या पंढरपुरात जाणारी एकही दिंडी नाही. येथील भाविक पैठण, आळंदी येथे जाऊन तिथील दिंडीत सहभागी होतात. मात्र, दिंडीत सहभागी होणे शक्य नसल्यामुळे काही शहरवासीयांना वारकऱ्यांची सेवा करण्यातच ‘विठोबा’ दिसतो. १५ वर्षांपासूनची ही परंपरा आजतागायत कायम ठेवली असून, यंदाही द्वादशीच्या दिवशी शहरातून गूळ-शेंगदाण्याचे ७० हजार लाडू, तसेच अडीच ते तीन हजार भाविकांसाठी पुरणपोळी, आमटी, भात, भजे, गुलाबजाम असे जेवणही दिले जाणार आहे.
१२०० महिला बांधणार लाडूदिंडी पंढरपुरात आल्यावर तिथेही वारकऱ्यांच्या सेवेसाठी लाखो हात पुढे येतात. तसेच छत्रपती संभाजीनगरातही शेंगदाण्याचे लाडू तयार करण्यासाठी शेकडो हात पुढे येतात. यंदा २५ जून रोजी गूळ-शेंगदाणा लाडू तयार करण्यात येणार आहेत. बालाजीनगरातील बालाजी मंगलकार्यालयात सकाळी ११ ते दुपारी २ वाजेदरम्यान १२०० महिला ७० हजार लाडू तयार करणार आहेत.
किती किलो गूळ, शेंगदाण्याचा होणार वापर१) ७० हजार लाडू तयार केले जाणार२) १००० किलो शेंगदाणे३) १००० किलो गूळ४) १०० किलो गावराण तूप
आषाढी एकादशीच्या दिवशी साबुदाणा खिचडी, भगरआषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरातील तनपुरे महाराज मठातून विठ्ठलाच्या मंदिरात जाऊन तिथे भगवंतांना नैवेद्य दाखविला जाईल. त्यानंतर मठात सकाळी गूळ-शेंगदाण्याचा लाडू व १०० किलोंची साबुदाणा खिचडी, तर सायंकाळी १०० किलोंची भगर-आमटी दिली जाणार आहे.
द्वादशीला पुरणपोळीचे जेवणद्वादशीला म्हणजेच ३० जूनला भगवंतांना नैवेद्य दाखवून सकाळी ७.३० वाजताच २०० किलो पुरणपोळी, कुरडया, पापड, भजे, आमटी, भात, गुलाबजाम असे जेवण वारकऱ्यांना देण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगरातून पंढरपूरला सामान नेऊन फराळ व स्वयंपाक तनपुरे मठात तयार केला जातो.
लाडू बांधण्यातून भाविकांची सेवाशहरातील विविध भागांतून १२०० पेक्षा जास्त महिला-मुली लाडू बांधण्यासाठी येत असतात. वारकऱ्यांच्या सेवेत आपलाही खारीचा वाटा असल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहते. ‘माझा एक तरी लाडू माझ्या पांडुरंगाला’ असे नाव आम्ही ठेवले आहे.मनोज सुर्वे, आयोजक, लाडूदान सोहळा