लोकमत न्यूज नेटवर्ककंधार : बारावी उत्तीर्ण झालेल्या व १८ वर्षे पूर्ण झालेल्या मुला-मुलींची नावे मतदारयादीत नोंद करण्यासाठी नव्याने व्यवस्था करण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे. महाविद्यालयात प्रवेश घेताना त्यांची नोंदणीची कार्यपद्धती कार्यान्वित करण्याचे निर्देश निवडणूक आयोग, राज्य शासनाने दिले आहेत. त्यामुळे तालुका निवडणूक विभागाचा भार हलका झाला आहे.निवडणूक आयोगाकडून नावे नोंदविणे, दुरुस्ती करणे ही कार्यवाही सतत चालू आहे. तरीही मतदारयादीत त्रुटी असल्याच्या तक्रारी होत असतात. त्यासाठी ठोस व्यवस्था निर्माण करण्याचा राज्य निवडणूक आयोग, राज्य शासन यांनी निर्देशित केले आहे. त्यासाठी कृषी विद्यापीठे, त्यांच्याशी संलग्नित अनुदानित महाविद्यालये, संस्था आदींनी प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या १८ वर्षे पूर्ण केलेल्या मुला-मुलींची मतदारयादीत नोंद करण्याची व्यवस्था केली आहे.महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी आपल्याकडील योग्य प्राध्यापकांना या कामासाठी ‘नोडल अधिकारी’ म्हणून नेमावे. मुला-मुलींकडून आवश्यकतेप्रमाणे नमुना क्र. ६, ७, ८ व ८ (अ) जमा करायचे आहेत. हे भरलेले फॉर्म जिल्हाधिकारी किंवा त्यांनी नामनिर्देशित केलेल्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करायचे आहेत. प्राचार्य व नोडल अधिकारी यांनी समन्वयाने ही प्रक्रिया बिनचूकपणे जिल्हाधिकारी यांच्यासोबत जबाबदारीने उचलायची आहे. विभागीय शिक्षण सहसंचालक कार्यालय नांदेड यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील महाविद्यालयांना तसे परिपत्रक पाठविले आहे. त्यावर महाविद्यालयस्तरावर तात्काळ कार्यवाहीसाठी हालचाली करण्यात आली. २०१७-१८ या शैक्षणिक वर्षाचे प्रवेश सुरु झाल्याने तरुण व पात्र विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. या उपक्रमामुळे मतदार नोंदणीही वाढण्यास मदत मिळेल, असा आशावाद व्यक्त होत आहे.
आता महाविद्यालयातच होणार मतदार नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2017 12:17 AM