मतदारांचा कल काँग्रेस महाआघाडीकडे झुकलाय : हर्षवर्धन पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 04:53 PM2019-04-12T16:53:41+5:302019-04-12T16:54:58+5:30
समाजाचा कुठलाच घटक शासनाच्या बाजूने नाही
औरंगाबाद : मतदारांचा कल काँग्रेस महाआघाडीकडे वाढत असून, महाआघाडीच्या जागा वाढल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वास काँग्रेसचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला.
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार सुभाष झांबड यांच्या प्रचारार्थ पाटील हे आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला. त्यांनी सांगितले की, गेल्या पाच वर्षांत भाजप-सेना महायुतीच्या सरकारने कुठल्याच आश्वासनांची पूर्तता केलेली नाही. त्यामुळे समाजातील कुठलाच घटक शासनाच्या बाजूने नाही.
स्थानिक पातळीवर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना जाहीर सभेसाठी व प्रियंका गांधी यांना रोड शोकरिता विनंती केली आहे. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेची मागणीही होत आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. नोकऱ्यांची घटत चाललेली संख्या, शेतकरी कर्जमाफी, राफेल विमान खरेदी घोटाळा, मराठा, धनगर, मुस्लिम आरक्षण, जीएसटी, महागाई, दुष्काळ आदी मुद्यांवरून पाटील यांनी जोरदार हल्ला चढवला. प्रभारी जिल्हाध्यक्ष अनिल पटेल, माजी आमदार एम.एम. शेख, अशोक सायन्ना, प्रकाश मुगदिया व डॉ. पवन डोंगरे उपस्थित होते.
खैरे हेच शहराच्या अधोगतीला जबाबदार
काँग्रेस सरकारने बांधलेल्या जायकवाडी धरणातून वीस वर्षांमध्ये खा. चंद्रकांत खैरे यांना शहरासाठी पाणी आणता आले नाही. गेली २० वर्षे खैरे संसदेत आहेत? पण संसदेत त्यांनी कधी २०मिनिटेही भाषण केले नाही. त्यांनी केलेले एक तरी काम दाखवावे, असे आव्हानच हर्षवर्धन पाटील यांनी दिले. या शहराच्या अधोगतीला खा.खैरे हेच जबाबदार असल्याचा स्पष्ट आरोप त्यांनी केला. ते म्हणाले की, काँग्रेसच्या विचारांमुळेच औरंगाबादचा हा परिसर दिसतो आहे. कॅन्सर हॉस्पिटल, लॉ कॉलेज, शहराला औद्योगिक स्वरूप देण्याचे काम काँग्रेसने केले आहे. आज औरंगाबादकर पाणी पाणी करीत आहेत. पण बाजूच्या जायकवाडी धरणातून खैरेंना हे पाणी आणता आले नाही.