वाळूज महानगर: वाळूज उद्योगनगरीत मंगळवारी मतदारांनी उत्साहात आपल्या मतदानाचा हक्क बजावला. सकाळपासून मतदारांनी मतदान केंद्रांवर लांबच-लांब रांगा लावल्या होत्या. उन्हाचा कडाका वाढल्यामुळे दुपारी मतदान केंद्रावर तुरळक गर्दी दिसून आली तर सायंकाळी पुन्हा मतदारांनी मतदानासाठी रांगा लावल्याचे दिसून आले.
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात औरंगाबाद मतदार संघासाठी मतदान करण्यासाठी मंगळवारी वाळूज उद्योनगरीसह परिसरातील बजाजनगर, रांजणगाव, वडगाव, साजापूर, पंढरपूर, वाळूज, घाणेगाव, जोगेश्वरी आदी ठिकाणी केंद्रांवर मतदारांनी सकाळपासून रांगा लावल्या होत्या. दुपारी १२ वाजेपर्यंत अनेक मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजावला. दुपारनंतर उन्हाचा पारा वाढल्यामुळे परिसरातील अनेक मतदार केंद्रावर तुरळक गर्दी दिसून आली.
सायंकाळी ४ वाजेनंतर मतदारांनी गर्दी केली होती. परिसरातील केंद्रांवर मतदारांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, दिव्यांगांसाठी व्हिलचेअरची व्यवस्था केली होती. मात्र, वाळूजच्या जिल्हा परिषद मतदान केंद्रावर व्हिल चेअर नसल्याने दिव्यांग मतदारांनी नाराजी व्यक्त केली.
गावात जवळपास ४०० दिव्यांग लाभार्थी असल्याने त्यांची गैरसोय झाली. यावेळी दिव्यांग मतदार पारसचंद साकला यांनी निवडणूक अधिका-याकडे तक्रार केल्यानंतर त्यांना या केंद्रावर वरिष्ठांनी व्हिल चेअर उपलब्ध करुन दिली नसल्याचे सांगितले. वाळूज हद्दीतील ५० तर एमआयडीसी वाळूज हद्दीतील १०७ मतदान केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.