अनुराग पोवळे ।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: विविध निवडणुकांसाठी वापरण्यात येणाºया ईव्हीएम अर्थात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राबाबत घेतली जाणारी शंका दूर करण्यासाठी निवडणूक आयोगाने आता पावले उचलली असून नांदेड महापालिकेच्या निवडणुकीत मतदारांना आपण कोणाला मतदान केले याची माहिती वोटर व्हेरीफाईड पेपर आॅडिट ट्रेलद्वारे मिळणार आहे. राज्यात पहिल्यांदाच हा प्रयोग केला जाईल.महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका आॅक्टोबर २०१७ मध्ये होणार आहेत. या निवडणुकीची प्रशासकीय पातळीवर तयारी वेगात सुरू आहे. आतापर्यंत मतदान यंत्राबाबत माहिती देणारे दोन प्रशिक्षणही घेण्यात आले आहेत. प्राथमिक मतदार यादीही प्रसिद्ध करण्यात आली आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक कार्यक्रमाची घोषणा होण्याची अपेक्षा राजकीय क्षेत्रातील जाणकार व्यक्त करीत आहेत. दुसरीकडे राजकीय पक्षांची तयारीही अंतिम टप्प्यात आली आहे.ईव्हीएम अर्थात ईलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राबाबत सातत्याने संशय घेतला जात आहे. देशपातळीपासून ते स्थानिक पातळीपर्यंत हा संशय कायमच राहिला आहे. हाच संशय दूर करण्यासाठी निवडणूक आयोगाने प्रयत्न सुरू केले आहेत. वोटर व्हेरीफाईड पेपर आॅडिट ट्रेलच्या माध्यमातून मतदारांना आपण केलेले मतदान त्याच उमेदवाराला गेल्याचे दिसणार आहे. मतदान यंत्रावरील उमेदवाराच्या निशाणीसमोरील बटन दाबताच व्हीव्ही पॅटवर उमेदवाराचे नाव, निशाणी येणार आहे.सदर मतदानाची पावती व्हीव्ही पॅटमध्ये जमा होणार आहे. मतदान केंद्राच्या बॅलेट मशिनवरील एकूण मतदान आणि व्हीव्ही पॅटमध्ये जमा झालेल्या मतदानाच्या पावत्यांचा आकडा एकच येणार आहे. त्यातून केंद्रावर झालेले एकूण मतदान स्पष्ट होईल.व्ही. व्ही. पॅट मशिन वापराबाबत सोमवारी महापालिकेत प्रशिक्षण घेण्यात आले.हैदराबादच्या ईसीआयएल या कंपनीच्या तीन प्रशिक्षकांनी महापालिकेचे संगणक परिचालक, अभियंते तसेच मास्टर ट्रेनरला प्रशिक्षण दिले. दोन सत्रांत झालेल्या या प्रशिक्षणाला आयुक्त गणेश देशमुख, निवडणूक विभागाचे उपायुक्त संतोष कंदेवार यांच्यासह महापालिकेचे सहायक आयुक्त अविनाश अटकोरे, सुधीर इंगोले, संजय जाधव, प्रकाश कांबळे आदींची उपस्थिती होती.प्रायोगिक तत्त्वावर नांदेडमध्ये या मशिनचा वापर केला जाणार आहे. विशेषत: संवेदनशील मतदान केंद्रावर व्हीव्ही पॅटचा वापर उपयुक्त ठरणार आहे.
व्ही.व्ही.पॅटद्वारे मिळणार मतदानाची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 12:30 AM