लोकमत न्यूज नेटवर्कइंदापूर : वाशी तालुक्यातील इंदापूर ग्रामपंचायतच्या प्रभाग क्र. ३ च्या पोटनिवडणुकीसाठी २७ मे रोजी मतदान घेण्यात आले. मतदान केंद्र संवेदनशील असल्याने चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दिवसभरात ८६४ पैकी ५८५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. २९ मे रोजी मतमोजणी होणार आहे.इंदापूर ग्रामपंचायतअंतर्गतच्या प्रभाग क्र. ३ ची पोटनिवडणूक जाहीर झाली होती. सर्वच प्रमुख पक्षांकडून ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी एका जागेसाठी तीन उमेदवार निवडणूक रिंगणात उरले होते. त्यानुसार राजेंद्र गपाट, दिनकर गपाट व प्रतीक गपाट या तिघांमध्ये लढत झाली. २७ मे रोजी सदरील पोटनिवडणुकीकरिता मतदान प्रक्रिया घेण्यात आली. सकाळी ७.३० ते सायंकाळी ६.३० या वेळेत ८६४ पैकी ५८५ मतदारांनी हक्क बजावला. यामध्ये ३०३ पुरुष, तर २५५ महिला मतदारांचा समावेश आहे. मतदान केंद्र संवेदनशील असल्याकारणाने वाशी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली पोकॉ दौलत कदम, पोना जाधव, भगवान मंदुमल्ले यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला. उपरोक्त तिन्ही उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले असून, २९ मे रोजी मतमोजणी होणार आहे.
चोख पोलीस बंदोबस्तात मतदान
By admin | Published: May 27, 2017 11:46 PM