औरंगाबाद : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदवीधर गटातील अधिसभेच्या १० जागांसाठी ४ जिल्ह्यात शनिवारी सकाळी ८ ते ५ वाजेदरम्यान दरम्यान ५१ केंद्रातील ८२ बूथवर ५३ उमेदवारांसाठी मतदान होणार आहे. मतपत्रिकेसह सर्व साहित्य घेऊन ४१० अधिकारी, कर्मचारी २२ वाहनांतून शुक्रवारी कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांच्या उपस्थितीत रवाना झाले. या निवडणुकीसाठी ५१ महाविद्यालयात मतदान केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या केंद्रावर २६ नोव्हेंबर रोजी शैक्षणिक कामकाज बंद राहील. मात्र, प्रशासकीय कामकाज सुरु राहणार आहे.
निवडणुकीसाठी मुख्य प्रशासकीय इमारतीच्या मागे शुक्रवारी दिवसभर निवडणुकी संदर्भात कामकाज सुरु होते. निवडणुकीसाठी एकूण ३६ हजार ६८२ मतदार आहेत तथापि खुल्या प्रवर्गासाठी ४० हजार तसेच अन्य पाचही मागास प्रवर्गासाठी प्रत्येकी ४० हजार अशा एकूण २ लाख ४० हजार मतपत्रिकासह मतदान केंद्रावर साहीत्य घेवून जाणाऱ्या वाहनांना कुलगुरु डॉ. येवले यांनी हिरवा झेंडा दाखविल्यानंतर वाहने रवाना झाली. यावेळी कुलसचिव डॉ.भगवान साखळे, बेगमपूराचे पोलीस निरीक्षक प्रशांत पोतदार आदींची उपस्थिती होती. निवडणूक विभागात वॉर रुमची स्थापना करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर आपले नाव तथा नोंदणीक्रमांक टाकल्यास मतदारांना केंद्र समजणार आहे. या निवडणुकीत मतदारांना प्राधान्यक्रम लिहून मतदान करावे लागणार आहे.
५३ उमेदवार रिंगणातखुल्या प्रवर्गासाठी ५ जागांसाठी २९ उमेदवारांची पांढऱ्या रंगाची मतपत्रिका आहे. राखीव गटातून प्रत्येकी एका जागेसाठी अनुसूचित जातीसाठी फिकट निळ्या रंगात ७ उमेदवारांची मतपत्रिका आहे. अनुसूचित जमातीसाठी पिस्ता रंगात ४ उमेदवारांची मतपत्रिका, भटके विमुक्त जाती-जमातीच्या ५ उमेदवारांसाठी फिकट हिरव्या रंगाची मतपत्रिका आहे. इतर मागास वर्गासाठी फिकट पिवळ्या रंगाच्या मतपत्रिका असूनमहिला गटासाठी फिकट गुलाबी रंगाची मतपत्रिका आहे. दोन्ही गटात प्रत्येकी चार उमेदवार आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यात १६ केंद्रावर १७, ७६५ मतदारशहरी यामध्ये देवगिरी महाविद्यालय ६ बूथ, विद्यापीठातील नाटयशास्त्र विभाग ६ बूथ, मौलाना आझाद महाविद्यालय ६ बूथ, विवेकानंद महाविद्यालय ४ बूथ, वसंतराव नाईक महाविद्यालय ४ बूथ , छत्रपती शिवाजी महाविद्यालय २ बूथ, सरस्वतीभूवन महाविद्यालय १ तर मिलिंद महाविद्यालय १ बूथ आहे. ग्रामीण भागात सिल्लोड येथे यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, कन्नड येथील शिवाजी महाविद्यालय, पैठण येथील प्रतिष्ठाण महाविद्यालय, फुलंब्री येथील संत सावता महाविद्यालय, खुलताबाद चिस्तीया महाविद्यालय, सोयगाव येथे संत ज्ञानेश्वर महाविद्यालय, वैजापुर येथील विनायकराव पाटील महाविद्यालय, गंगापुर येथे मुक्तानंद महाविद्यालय येथे मतदान केंद्र आहे.
बीड जिल्ह्यात १६ केंद्रावर १२,५९३ मतदारबीड येथील केएसके महाविद्यालय, बलभीम महाविद्यालय, मिल्लीया महाविद्यालय, खोलेश्वर महाविद्यालय, केज येथील वसंत महाविद्यालय, गेवराई आर.बी.अटल महाविद्यालय, परळी येथील वैद्यनाथ महाविद्यालय, आष्टी महाविद्यालय, धारूर एसएसपी महाविद्यालय, पोटोदा येथे पीव्हीपी महाविद्यालय, वडवणी लोकमान्य टिळक महाविद्यालय, चौसाळा नवगण महाविद्यालय, शिरूर कासार कालिका महाविद्यालय
जालना जिल्ह्यात ९ केंद्रावर ३,९९३ मतदारघनसावंगी येथील स्वामी रामानंद महाविद्यालय, जालना येथील अंकुशराव टोपे महाविद्याल, जे.ई.एस. महाविद्यालय, अंबड येथील मत्योदरी महाविद्यालय, भोकरदन येथील मोरेश्वर आणि लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय, मंठा स्वामी विवेकानंद महाविद्यालय, जाफ्राबाद येथील सिध्दार्थ महाविद्यालय, बदनापुर येथील निर्मल ट्रस्ट कला महाविद्यालय
उस्मानाबाद १० केंद्रावर २,५३१ मतदारतुळजापुर येथील तुळजाभवाणी महाविद्यालय, उस्मानाबाद येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालय, उमरगा येथील छत्रपती शिवाजी महाराज महाविद्यालय, लोहार येथील शंकरराव जावळे महाविद्यालय, ढोकी येथील कला महाविद्यालय, कळंब येथील शिक्षण महर्षी मोहेकर महाविद्यालय, वाशी येथील कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय, भूम येथील शंकरराव पाटील महाविद्यालय, परंडा येथील शिक्षण महर्षी आर.जी.शिंदे महाविद्यालय , कळंब येथील कला महाविद्यालयात मतदान केंद्र असणार आहे.