छत्रपती संभाजीनगर : केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडेकोट सुरक्षा तैनात केली आहे. शुक्रवारी दुपारी १२ वाजेपासून कॅनॉट प्लेसच्या दिशेने जाणारे सर्व मार्ग बंद राहणार असून मंत्र्यांच्या ताफ्यादरम्यान जालना रोडवरही वाहतूक थांबवली जाईल. त्यामुळे जवळपास तीन तासांपेक्षा अधिक वेळ सेव्हनहील ते सिडको चौकादरम्यानची वाहतूक खोळंबली जाण्याची शक्यता आहे. सुरक्षा प्रोटोकॉलमुळे पोलिस विभागाने ही सतर्कता बाळगली असली तरी त्याचा सर्वसामान्यांना त्रास होणार आहे.
सिडको कॅनॉट प्लेस येथील बहुप्रतीक्षित शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचे अनावरण केंद्रीय संरक्षण मंत्री राजनासिंह यांच्या हस्ते होत आहे. यावेळी राज्यपाल हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराणा प्रताप यांचे वंशज लक्ष्यराज सिंह, पालकमंत्री संजय शिरसाठ, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, विरोधी पक्ष नेता अंबादास दानवे, पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांची प्रमुख उपस्थिती असेल. या अतिमहत्त्वाच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सतर्कता बाळगली आहे.
कॅनॉट प्लेसला लष्करी छावणीचे स्वरूप- केंद्रीय संरक्षण मंत्र्यांना झेड प्लस सुरक्षा प्रदान आहे. यात एनएसजी, सीआरपीएफचे ३६ ते ४५ सशस्त्र जवान, ताफ्यात बुलेटप्रूफ गाडी, जॅमर व्हेईकलचा समावेश असतो. कार्यक्रमस्थळी शहर पोलिसांकडून १ हजार पोलिसांपेक्षा अधिक कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आसपासच्या प्रत्येक इमारतीवर पोलिस तैनात असतील. शिवाय, ड्रोनद्वारे कार्यक्रमस्थळी निगराणी ठेवण्यात येणार आहे.
कॅनॉट प्लेस अप्रत्यक्ष बंद, कोट्यवधींची उलाढाल ठप्प- तीन दिवसांपासून पोलिसांनी कॅनॉट प्लेसमधील व्यापारी, नागरिकांना नोटीसद्वारे निर्बंधाच्या सूचना केल्या. पोलिसांनी सोसायटी अध्यक्षांसह प्रत्येक घरी जात स्थानिकांना अवगत केले. भाडेकरूंची माहिती सिडको ठाण्यात देणे बंधनकारक केले.- सायंकाळी कार्यक्रमादरम्यान २ तासांसाठी कोणालाही गॅस पेटवता येणार नाही. दिवसभर दुकाने, कॅफे, हॉटेलमध्ये ज्वलनशील पदार्थ ठेवता येणार नाहीत.- दुपारी १२ वाजेपासून सायंकाळी कार्यक्रम संपेपर्यंत सामान्यांसाठी कॅनाॅट प्लेस प्रवेश बंद असेल. कार्यक्रमाच्या वेळी वन गेट एंट्री राहील. त्यामुळे कॅनॉट प्लेस दुपारी १२ वाजेपासून अप्रत्यक्षरीत्या ७ तासांसाठी बंद राहील. यामुळे जवळपास कोट्यवधींचा व्यवहार ठप्प होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.
हे मार्ग असतील बंददुपारी १ ते सायंकाळी ७ दरम्यान खालील मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद असतील.- रामगिरी हॉटेल (अग्रसेन चौक) ते हॉटेल शिवा (केंद्रीय जीएसटी कार्यालय).- चिश्तिया चौक ते सिडको एन-१ चौक.- सपना मोमोज ते एसबीआय कॉर्नर.
जालना रोडवरही खोळंबणारअतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे जालना रोडस्थित रामा इंटरनॅशनल हॉटेलला काही वेळ वास्तव्य राहणार आहे. त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी पोलिसांनी २१ मिनिटांच्या व्हीव्हीआयपी प्रोटोकॉलचा चाचपणी घेतली. यादरम्यान जवळपास २ तास वाहतुकीचा खोळंबा झाला. शुक्रवारीदेखील व्हीव्हीआयपी ताफ्यादरम्यान जालना रोडवरील वाहतूक थांबवण्यात येणार आहे. त्यामुळे सायंकाळी ५ ते ८ असे ३ तास सेव्हनहील ते सिडको बसस्थानक मार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात खोळंबण्याची दाट शक्यता आहे.