वाळूज महानगर: वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायतीकडून पाणी पुरवठ्यास टाळाटाळ केली जात असल्याने छत्रपतीनगरातील संतप्त महिलांनी सोमवारी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढून प्रवेशद्वारालाच टाळे लावले. तसेच महिलांनी सरपंचाला घेराव घातला. पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला पण त्यात यश आले नाही. अखेर ग्रामविकास अधिकाऱ्यांनी दिवाळी झाल्यावर काम सुरु करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याने महिलांनी आंदोलन मागे घेतले.
छत्रपतीनगर भागाला ग्रामपंचायतीकडून पाणीपुरवठा केला जातो. पण जुनी पाईपलाईन चुकीची टाकली गेल्याने या वसाहतीला कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. पाण्यासाठी हाल होत असल्याने नागरिकांना अनेकवेळा अर्ज, विनंत्या, आंदोलने करुन पाणी पुरवठा करण्याची मागणी केली आहे. पण दरवेळी ग्रामपंचायतीने केवळ आश्वासनांवर रहिवाशांची बोळवण केली.
ग्रामपंचायतीने नवीन पाईपलाईनचा प्रस्ताव मंजूर करुन हे काम खाजगी ठेकेदाराला दिले आहे. पण ठेकेदाराकडून अजून कामला सुरुवात केलेली नाही. यापूर्वी महिलांनी २४ आॅक्टोबर रोजी मोर्चा काढला होता. तेव्हा पं.स. सदस्य राजेश साळे आणि सरपंच उषा एकनाथ साळे यांनी १ नोव्हेंबरपासून नवीन पाईपलाईनचे काम सुरु होईल, असे आश्वासन दिले. मुदतीत या कामाला सुरुवात न झाल्याने जवळपास ७० महिलांनी सोमवारी सकाळी ११ वाजता ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढला. कार्यालयात जबाबदार कोणीच अधिकारी उपस्थित नसल्याने महिलांनी प्रवशेद्वाराला टाळे लावत ठिय्या दिला.
यावेळी कार्यालयात जात असलेल्या सरपंच उषा साळे यांना प्रवेशद्वारावरच अडवून त्यांना घेराव घातला. महिलांच्या प्रश्नांचा भडीमार पाहून सरपंचानी तेथून काढता पाय घेतला. महिला ऐकत नसल्याचे पाहून ग्रामपंचायतीने वाळूज एमआयडीसी पोलिसांना बोलावून घेतले. यावेळी फौजदार लक्ष्मण उंबरे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला.
पण पाणी दिल्याशिवाय आम्ही येथून जाणार नाही, असा पवित्रा सुनिता जाधव, मनिषा राजपूत, राधा मिरगे, सुनिता मगर, अपेक्षा पाटील, जयश्री घुले, पुष्पा तोडकर, योगिता गोडबोले, आश्विनी जाधव, सुनंदा खंदारे, राधा अहिरे, कांता म्हस्के, अलका खताळ, पुष्पा राठोड, नर्मदा साळुंके, श्रद्धा आडे, माधुरी सपाटे, अपेक्षा पाटील आदी महिलांनी घेतल्याने पोलिसांनाही माघार घ्यावी लागली. अखेर पंचायत समिती सदस्य राजेश साळे यांनी ग्रामविकास अधिकाºयांचे महिलांशी बोलणे करुन दिले. दिवाळीनंतर प्रत्यक्षात कामास सुरुवात केली जाईल, असे आश्वासन दिल्याने महिलांनी आंदोलन मागे घेतले.
लवकरच काम सुरु होईलनवीन पाईपलाईनचे काम मोठे आहे. त्याला वेळ द्यावा लागणार आहे. पाईपची आॅर्डर दिली आहे. लकवरच काम सुरु होईल, असे ग्रामविकास अधिकारी विलास कचकुरे व सरपंच उषा साळे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.