१४ एप्रिल २०२१ रोजी केलेल्या आरटीपीसीआर चाचणीचे प्रमाणपत्र घेण्यासाठी नवनाथ राठोड सोमवारी सायंकाळी ५ वाजता आरोग्यवर्धिनी (प्राथमिक आरोग्य) केंद्र वडनेर येथे गेले असता सदर केंद्राला कुलूप लावलेले दिसले. यामुळे त्यांचा संताप अनावर झाला व त्यांनी समाजमाध्यमावर व्हिडिओ प्रसारित केला.
वडनेर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आदिवासी वाड्या, तांड्यांची संख्या जास्त आहे. तशात सध्या तालुक्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. सगळ्यात जास्त रुग्ण असलेले आंबा तांडा हे गाव याच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हद्दीत आहे. मात्र, येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी केंद्र बंद करून निघून जातात. एखाद्या रुग्णाला रात्रीच्या वेळी औषधोपचाराची आवश्यकता भासली तर काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
संबंधितांकडून खुलासा मागवून वरिष्ठांना अहवाल पाठविण्यात येईल, असे तालुका आरोग्याधिकारी डॉ. हेमंत गावंडे यांनी सांगितले.