औरंगाबाद : जि.प., पं.स. निवडणुका तोंडावर आल्या असताना जिल्ह्यातील शिवसेनेच्या पाच आमदारांनी बंडखोरी केल्याने त्यांच्या समर्थकांना आता स्वत:च्या राजकीय भवितव्याची चिंता सतावू लागली आहे.
शिवसेनेत गद्दारीला स्थान नसल्याने थेट पक्षप्रमुखांविरोधात बंड करणाऱ्या या आमदारांच्या बाबतीत शिवसेनेचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत, तर त्यांच्या समर्थकांनी वेट ॲण्ड वॉचची भूमिका घेतली. पावसाळ्यानंतर जि.प., पं.स. निवडणुका होतील. गत निवडणुकीत शिवसेनेचे १९ सदस्य जि.प.वर निवडून गेले होते. शिवसेनेच्या पाच मंत्र्यांसह आमदारांनी उघड बंड केले. यात पैठणचे रोहयो आणि फलोत्पादन मंत्री तथा पैठणचे आमदार संदीपान भुमरे, राज्यमंत्री तथा सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार, वैजापूरचे आ. रमेश बोरनारे, औरंगाबाद पश्चिमचे आ. संजय शिरसाट, मध्यचे आ. प्रदीप जैस्वाल यांचा समावेश आहे. सिरसाट आणि जैस्वाल वगळता उर्वरित आमदार हे ग्रामीण भागातील आहेत.
अडीच वर्षापूर्वी काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या राज्यमंत्री सत्तार यांच्यासोबत त्यांचे समर्थक सहा जि.प. सदस्यही शिवसेनेत आले होते. ते सर्व जण पुढेही त्यांच्यासोबत राहू शकतात. त्यांचे समर्थक माजी जि.प. अर्थ व बांधकाम सभापती किशोर बलांडे हे त्यांना भेटायला गुवाहाटीला गेले आहेत. वैजापूर तालुक्यात जि.प.चे ११ गट आहेत. प्रत्येक सर्कलमध्ये शिवसेनेसह सर्वच पक्षातील इच्छुकांनीही निवडणुकीची तयारी सुरू केली. आ. बोरनारे समर्थक म्हणून ओळखले जाणारे जि.प. शिक्षण सभापती अविनाश गलांडे यांनी मात्र पक्षाला पसंती देत क्रांती चौकात बुधवारी झालेल्या पक्षाच्या आंदोलनात सहभाग नोंदविला. पक्षाने आम्हाला भरपूर दिल्याने आम्ही कायम पक्षासोबत राहू, असे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
भुमरे यांच्या तालुक्यात जिल्हा परिषदेत शिवसेनेचे ९ सदस्य होते. यापैकी ८ त्यांचे समर्थक होते, असे मानले जाते. या समर्थकांनी ‘वेट ॲण्ड वॉच’ची भूमिका घेतली. भुमरे यांनी शिवसेनेसोबत राहावे, अशी भावना त्यांचे समर्थक रमेश पवार यांनी व्यक्त केली. काही समर्थकांनी आमदारांचा निर्णय आम्हाला मान्य असेल, असे सांगत, ’वेट ॲण्ड वॉच’ची भूमिका असल्याचे सांगितले.