औरंगाबाद : अखेर कोरोनाच्या ९ महिन्यांनंतर पुन्हा एकदा औरंगाबादहून १६ डिसेंबरपासून बंगळुरूसाठी विमानसेवा सुरू होत आहे. विशेष म्हणजे इंडिगोकडून सुरू होणाऱ्या या विमानसेवेमुळे शहराला चेन्नईचीही कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. त्यासाठी प्रवाशांना विमानदेखील बदलावे लागणार नाही.
आयटी हब म्हणून बंगळुरूची ओळख आहे. शहरातील आयटी आणि उद्योग क्षेत्रासह बंगळुरू येथे शिक्षण घेणाऱ्या, नोकरी करणाऱ्यांसाठी विमानसेवा महत्त्वपूर्ण ठरते; परंतु कोरोनामुळे विमानसेवा ठप्प झाली होती. कोरोनाचा विळखा कमी झाल्यानंतर औरंगाबादहून एअर इंडिया आणि इंडिगोच्या माध्यमातून दिल्ली, मुंबई आणि हैदराबादसाठी विमानसेवा पुन्हा एकदा सुरू झाली. गेली काही दिवस बंगळुरू विमानसेवा सुरू होण्याची प्रतीक्षा होती. अखेर ही कनेक्टिव्हिटी बुधवारपासून मिळणार आहे.
उद्योजक सुनीत कोठारी म्हणाले, बुधवारपासून सुरू होणाऱ्या इंडिगोच्या बंगळुरू विमानसेवेमुळे शहराला चेन्नईची सेवा मिळणार आहे. बंगळुरूहून हे विमान तासाभराने पुढे चेन्नईला जाईल. त्यासाठी चेन्नईला जाणाऱ्या प्रवाशांना विमानदेखील बदलावे लागणार नाही. औरंगाबादहून बंगळुरूला दीड तासात, तर चेन्नईला ४ तासांत पोहोचणे शक्य होणार आहे.