औरंगाबाद : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा पॉझिटिव्हिटी रेट कमी होत असल्यामुळे जिल्ह्यातील लॉकडाऊनचे काही निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. राज्य सरकारने १४ जिल्ह्यांतील निर्बंध शिथिल केले असून, त्यात औरंगाबादचा समावेश आहे. ( the restrictions are relaxed; Trade allowed in Aurangabad district till 8 pm)
शासनाने १४ जिल्ह्यांत औरंगाबाद जिल्ह्याचा समावेश केल्यामुळे लॉकडाऊनमध्ये मिळालेल्या नवीन सवलतींचा लाभ येथील बाजारपेठेला होणार आहे. व्यापारी वर्गातून मागील काही दिवसांपासून लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्याची मागणी होती, त्या मागणीला शासनाने प्रतिसाद दिला असून, आता रात्री आठ वाजेपर्यंत व्यापारास मुभा राहील.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसह डेल्टा प्लस या विषाणू संसर्गाची चाहूल लागल्यामुळे शासनाच्या आदेशानुसार, २८ जूनपासून औरंगाबाद जिल्हा तिसऱ्या स्तरात आहे. जिल्ह्यात मिनी लॉकडाऊन सुरू आहे. २९ जूनपासून सकाळी ७ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत व्यवहाराला सध्या परवानगी आहे. सायंकाळी ५ वाजेपर्यंंत जमाव आणि नंतर सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी आहे. शनिवार आणि रविवार अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही १०० टक्के बंद आहे. शासनाने काढलेले आदेश जिल्हाधिकारी कार्यालयास रात्री उशिरापर्यंत मिळाले नव्हते. त्यामुळे ३ ऑगस्ट रोजी आदेश आल्यानंतर, शासन निर्णयांची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.
जिल्हाधिकारी चव्हाण म्हणालेशहर व जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेले निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात शासनाने काढलेले लेखी आदेश प्राप्त झाल्यानंतर, जिल्हा प्रशासन, पोलीस, महापालिका प्रशासनाची बैठक होईल. त्या बैठकीनंतर शासनाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय होईल, असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले.
मॉल्ससह सर्व दुकाने सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत उघडणार- सर्व दुकाने (शॉपिंग मॉल्ससह) आठवड्यातील सोमवार ते शुक्रवारपर्यंत सकाळी ७ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत आणि शनिवारी दुपारी ३ वाजेपर्यंत खुले राहतील. अत्यावश्यक सेवा आणि दुकाने वगळता रविवारी १०० टक्के लॉकडाऊन असेल.- सर्व उद्याने, खेळाची मैदाने, वॉकिंग, जॉगिंग आणि सायकलिंगसाठी खुले राहील. सर्व शासकीय आणि खासगी कार्यालये पूर्ण क्षमतेने निर्धारित वेळेत खुली राहतील.- कृषी क्षेत्राशी निगडित कामे, बांधकामे, उद्योग, मालवाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.- जिम्नॅशियम, योगा सेंटर, हेअर कटिंग सलून, ब्युटी पार्लर, स्पा सेंटरमध्ये एससी वापरण्यास मनाई असेल, तसेच ५० टक्के क्षमतेने सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजेपर्यंत, शनिवारी दुपारी ३ वाजेपर्यंत खुले राहण्यास परवानगी दिली आहे.- सर्व सिनेमागृह, नाट्यगृह, मल्टिप्लेक्स पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहेत, तसेच धार्मिक स्थळेही बंद असतील. शिक्षण विभाग, उच्च व तंत्रशिक्षण विभागाने दिलेले आदेश शाळा, महाविद्यालयांसाठी लागू असतील.- सर्व रेस्टॉरंट्स, हॉटेल्समध्ये ५० टक्के क्षमतेत सांयकाळी ४ वाजेपर्यंत डायनिंग सुविधा असेल. त्यानंतर, पार्सल सुविधा सुरू राहील.- रात्री ९ ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी असेल.- गर्दी जमविणे, वाढदिवस साजरा करणे, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम, निवडणुका, प्रचार, मिरवणुका, आंदोलन, मोर्चांबाबत असलेले निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत.