औरंगाबाद : औरंगाबादहून १ जुलैपासून विमानांचे उड्डाण सुरू करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे यांनी दिली. त्यामुळे शहराची विमानसेवेची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे.
कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे गेल्या दोन महिन्यांपासून विमानसेवा बंद आहे. औरंगाबादहून जुलैपासून विमानांचे उड्डाण सुरू करण्याचे नियोजन इंडिगोने केले आहे. मुंबई, दिल्ली, हैदराबाद आणि बंगळुरूसाठी या कंपनीकडून जुलैपासून बुकिंगदेखील सुरू करण्यात आली आहे. मार्चपासून देशात लॉकडाऊन सुरू आहे आणि तेव्हापासून विमानसेवा बंद आहे. मुंबईसह विविध शहरांतून २५ मेपासून विमानांचे उड्डाण सुरू करण्यात आले आहे.
औरंगाबादपेक्षा जास्त रुग्णसंख्या असूनही पुण्यातून विमानसेवा सुरू करण्यात आली; परंतु औरंगाबादहून विमानसेवा सुरू होण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. याविषयी उद्योजकांनी टीकाही केली; परंतु विमानसेवेची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. १ जुलैपासून विमानसेवा सुरू होणार असल्याची माहिती डी.जी. साळवे यांनी दिली.