संतोष हिरेमठ
औरंगाबाद : हॅलाे...१०८ रुग्णवाहिका, अपघात झाला आहे, प्रसूतीसाठी जायचे आहे, कोरोना रुग्ण आहे, लवकर या, हे शब्द १०८ रुग्णवाहिकेच्या यंत्रणेतील लोकांना अवघ्या काही मिनिटांच्या अंतराने सतत ऐकावे लागत आहेत. एक होत नाही तोच दुसरा काॅल. दिवसभरात तब्बल ३०० पेक्षा अधिक फोन. मग काय एका रुग्णाला सोडल्यानंतरच लगेच दुसऱ्या रुग्णासाठी धाव घ्यावी लागते. त्यामुळे अशावेळी अनेकांना रुग्णवाहिकेची प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
आपत्कालीन स्थितीत उपचार न मिळाल्याने एकही जण दगावता कामा नये, यासाठी शासनाने १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका सेवा सुरू केली. प्रत्येकाला गोल्डन अवरमध्ये उपचार मिळावेत यासाठी ही सेवा सुरू केली. अपघात, मारहाण, जळणे, हृदयरोग, पडणे, विषबाधा, प्रसूती, विजेचा धक्का, मोठा अपघात, औषधी, इतर, आत्महत्या या १२ प्रकारच्या रुग्णसेवा १०८ रुग्णवाहिकेच्या माध्यमातून दिल्या जातात. त्याबरोबर आता कोरोना रुग्णांनाही रुग्णालयापर्यंत पोहोचविण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे रुग्णवाहिकांवर भार वाढला आहे.
जिल्ह्यात अशा ३१ रुग्णवाहिका धावतात. रुग्णवाहिकेत बेसिक लाईफ सपोर्ट सिस्टिम आणि अद्ययावत वैद्यकीय उपचार उपकरणांचा समावेश आहे. गेल्या तीन महिन्यांत ८ हजार ५५९ जणांचे प्राण वाचविण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे. प्रत्येकाला वेळेवर उपचार मिळावेत यासाठी रुग्णवाहिकांना विशिष्ट अंतरावर थांबा देण्यात आला आहे. जेणेकरून गरजूचा दूरध्वनी येताच काही मिनिटांच्या आत जवळच्या लोकेशनवरील रुग्णवाहिकेला सूचना दिली जाते. फोन आल्यानंतर १५ ते २० मिनिटांत रुग्णवाहिका रुग्णांपर्यंत पोहोचत असल्याचे सांगण्यात आले. मार्चमध्ये ७१५ कोरोना रुग्णांना रुग्णालयात पोहोचविल्याचे समन्वयक ओमकुमार कोरडे म्हणाले.
------
जिल्ह्यातील १०८ रुग्णवाहिकांची संख्या-३१
६० टक्के फोन ग्रामीण भागातील.
४० टक्के फोन शहरातील.
------
१०८ रुग्णवाहिकेतून झालेली कोरोना रुग्णांची वाहतूक
महिना- रुग्णसंख्या
जानेवारी- ६२
फेब्रुवारी- ५१
मार्च-७१५
-------
कोरोनाव्यतिरिक्त अन्य रुग्णांची वाहतूक
जानेवारी-३३८१
फेब्रुवारी-२५१०
मार्च-२६६८
---
सर्व रुग्णांना सेवा
कोरोना रुग्णांसाठी बेड कन्फर्म असेल तरच १०८ रुग्णवाहिकेला फोन केला पाहिजे. अन्यथा बेड शोधत फिरावे लागते. त्यातून रुग्णवाहिका व्यस्त राहते आणि अन्य रुग्णासाठी लांब असलेली रुग्णवाहिका पाठवावी लागते. कोरोना रुग्ण असो वा अन्य रुग्ण सर्वांना रुग्णवाहिका उपलब्ध होत आहे.
- तुषार भोसले, झोनल मॅनेजर, मराठवाडा