- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सध्या गंभीर रुग्णांना व्हेंटिलेटरसाठी अक्षरश: एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात भटकंती करावी लागत आहे. घाटी रुग्णालयात प्रत्येक रुग्णाला दाखल करून घेतले जाते. परंतु व्हेंटिलेटर मिळण्याची इथेही आता प्रतीक्षा करण्याची वेळ ओढावत आहे. अशा परिस्थितीत घाटीने दोन वर्षांपूर्वी हाफकिनला ४ कोटींचा निधी वर्ग केला. पण अद्यापही ३३ आयसीयु व्हेंटिलेटर मिळालेले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
शहरात कोरोनाचे सर्वाधिक गंभीर रुग्ण हे घाटी रुग्णालयात दाखल होत आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावात ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची गरज असलेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. ऑक्सिजन असलेल्या रुग्णाला व्हेंटिलेटरची गरज असल्याचे सांगितले जाते, मात्र, व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्याचे सांगण्याची वेळ खासगी आणि शासकीय रुग्णालयात ओढावत आहे. घाटी रुग्णालयात गेल्या काही दिवसांत केंद्र सरकार, जिल्हा प्रशासन, सीएसआर फंडातून व्हेंटिलेटर उपलब्ध झाले. पण तरीही रुग्णसंख्येपुढे व्हेंटिलेटर अपुरे पडत असल्याची स्थिती आहे.
या सगळ्यात कोरोना प्रादुर्भाव सुरू होण्यापूर्वी दोन वर्षांपूर्वी घाटीने आयसीयु व्हेंटिलेटरसाठी ४ कोटींचा निधी वर्ग केला आहे. परंतु कोरोना प्रादुर्भावाला वर्ष उलटूनही हे व्हेंटिलेटर काही दाखल झाले नाहीत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत व्हेंटिलेटरची गरज वाढली. तरीही हाफकिनकडून हे व्हेंटिलेटर अजून मिळालेले नाहीत. याविषयी अधिष्ठाता डाॅ. कानन येळीकर यांच्याशी संपर्क साधला असता, हाफकिनकडून खरेदी प्रक्रिया सुरू असून, लवकरच व्हेंटिलेटर मिळतील, अशी माहिती त्यांनी दिली. रुग्णांची गैरसोय होत नसून, आयसीयुबरोबर वाॅर्डांतही व्हेंटिलेटरची सुविधा देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
१०० व्हेंटिलेटर मिळाले, पण आयसीयुसाठी बिनकामाचेकेंद्र सरकारकडून काही दिवसांपूर्वी १०० व्हेंटिलेटर मिळाले असून, हे सर्व व्हेंटिलेटर घाटीत पोहोचले. मात्र, हे व्हेंटिलेटर आयसीयुत वापरता येणारे व्हेंटिलेटर नाहीत. ऑक्सिजनवरून व्हेंटिलेटवर जाण्यापूर्वीच्या अवस्थेतील रुग्णांसाठी केंद्राने दिलेले व्हेंटिलेटर वापरता येणार आहेत. त्यामुळे घाटीची आयसीयु व्हेंटिलेटरची गरज कायम असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
घाटीतील स्थिती- दाखल कोरोनाबाधित रुग्ण- ६१८- गंभीर रुग्ण- ५१४- सामान्य स्थिती- १०४- उपलब्ध आयसीयु व्हेंटिलेटर- १२०